गारपीट आणि अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याने यंदा नाशिककरांना नेहमीच्या तुलनेत कमी प्रमाणात आंब्याची चव चाखणे क्रमप्राप्त ठरणार आहे. नुकसानीमुळे यंदा जेमतेम आंबा शिल्लक आहे. त्यामुळे त्याचे भावही गतवर्षीच्या तुलनेत चढे राहणार आहेत. या परिस्थितीत कोकण कृषी पर्यटन विकास संस्थेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. १८ एप्रिलपासून या आंबा महोत्सवास सुरुवात होत आहे.
या बाबतची माहिती संस्थेचे प्रमुख दत्ता भालेराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाशिककरांना नैसर्गिकरित्या गवतात पिकविलेला निर्यातक्षम दर्जाचा हापूस आंबा उपलब्ध व्हावा या उद्देशाने कोकण पर्यटन संस्था दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करते. यंदा महोत्सवाचे हे ११ वे वर्ष आहे. नेहमीचा महोत्सव आणि यंदाचा महोत्सव यात कमालीचा फरक आहे. गतवर्षी आंब्याचे मुबलक उत्पादन झाले. त्यामुळे भावही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे होते. महोत्सवाच्या अखेरच्या वेळी १२०० ते १३०० रुपयात आंब्याची पेटी ग्राहकांना उपलब्ध झाली. यंदा मात्र स्थिती पूर्णपणे बदलली आहे. नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका आंब्याला बसला. जानेवारी ते एप्रिल या काळात हे संकट कोसळत असताना आंबा झाडावर होता. त्यात कोकणात ६० ते ७० टक्के नुकसान झाले. यामुळे यंदा नेहमीच्या तुलनेत अतिशय कमी प्रमाणात हापूस आंबा उपलब्ध आहे. त्यांचे भावही सुरुवातीला ५०० ते ६०० रुपये डझन राहणार असल्याचा अंदाज भालेराव यांनी व्यक्त केला. म्हणजे मागील वर्षी हापूस आंब्याची पेटी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दरवाढीमुळे काही डझन आंबे खरेदीवर समाधान मानावे लागू शकते.
सीबीएस लगतच्या जिल्हा बँकेच्या जुन्या इमारतीतील सभागृहात होणाऱ्या महोत्सवाचे उद्घाटन आ. देवयानी फरांदे यांच्या हस्ते तर उद्योगपती राधाकिसन चांडक यांच्या उपस्थितीत होणार आहे. महोत्सवात कोकणातील सुमारे २५ आंबा उत्पादक शेतकरी सहभागी होतील. त्यांचे स्टॉल महोत्सवात राहणार आहेत. नैसर्गिकरित्या पिकविलेला आंबा, काजू, फणस, जांभूळ व आवळा यापासून बनविलेला कोकणमेवा विक्रीस उपलब्ध राहील.
सकाळी अकरा ते रात्री आठ या कालावधीत महोत्सव नागरिकांसाठी खुला राहणार असल्याचे संयोजकांनी म्हटले आहे.