खाडीकिनारी असणाऱ्या खारफुटीला मुंबई उच्च न्यायालयाने संरक्षण कवच दिलेले असताना नवी मुंबईत अनेक ठिकाणी खारफुटीवर संक्रांत येत असून डेब्रिजच्या गाडय़ा रिकाम्या करून त्या कचऱ्याला आग लावण्याचे प्रकार सर्रास घडू लागले आहेत. नेरुळ सी-वुड येथील दिल्ली पब्लिक स्कूलमागे असा प्रकार अधूनमधून घडत असून स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. ऐरोलीसारख्या ठिकाणी आजही खारफुटीची जळाऊ लाकूड म्हणून तोड केली जात असल्याचे आढळून आले आहे. खारफुटीच्या कुशीत असलेल्या काही जुन्या प्रार्थनास्थळांचा जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टीने काही ग्रामस्थ आजूबाजूच्या या जमिनी हडप करण्याचे षड्यंत्र रचत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. दक्षिण भारतात झालेल्या त्सुनामीनंतर खाडीकिनारी असणाऱ्या खारफुटींचे महत्त्व अधोरेखित झालेले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई या बेटाचे महत्त्व लक्षात घेऊन या शहराच्या जवळ असणाऱ्या खारफुटींचे संरक्षण करण्यावर भर दिला आहे. खारफुटीमुळे समुद्राच्या लाटा आणि त्सुनामीला थेट नागरी वस्तीवर आदळता येणार नाही. समुद्राच्या लाटा आणि लोकवस्ती यामध्ये खारफुटी ही अजोड भिंत राहणार आहे. खारफुटीच्या या संरक्षक भिंतीमुळे स्थानिक प्राधिकरणांना खारफुटीचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर गेली काही वर्षे खारफुटीसंदर्भात शासकीय यंत्रणा सतर्क राहिल्या. त्यामुळे खारफुटीचे चांगले संवर्धन होऊ शकले आहे. अनेक ठिकाणी समुद्र जैवविविधता वाढली आहे, पण अलीकडे या दक्षतेमध्ये शिथिलता आल्याने खारफुटी नाश करणाऱ्या घटकांचे फावले आहे. मुंबई, नवी मुंबईत जमिनींना सोन्याचा भाव आल्याने खारजमीनदेखील महत्त्वाची झाली आहे. त्यामुळे खारफुटीवर सर्वप्रथम मुंबईतून येणारे डेब्रिज टाकले जात आहे. त्यानंतर काही दिवसांनी या घनकचऱ्याला आग लावण्याचे प्रकार केले जात आहेत. त्यामुळे खाडीकिनाऱ्यांच्या जागा आता आगीच्या धुराने धुमसताना दिसत आहेत. नेरुळ येथील दिल्ली पब्लिक स्कूलच्या मागील बाजूस हा प्रकार उघडकीस आल्याने काही संस्था पुन्हा न्यायालयात गेलेल्या आहेत. हाच प्रकार सारसोळे, करावे, दारावे, ऐरोली, कोपरखैरणे या भागात आता दिसून येऊ लागला आहे. यामागे खारजमीन असणाऱ्या काही जमीन मालकांचा हात असल्याची चर्चा आहे. ऐरोलीत सिडकोने विकासासाठी दिलेल्या काही जमिनीलगत अशी खारफुटीतोड होत असून रातोरात खारफुटी गायब होत आहे. या सर्वाकडे पालिका, सिडको, कोकण विभागीय आयुक्त, वन विभाग आणि महाराष्ट्र सागरी नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे नवी मुंबईत आजही राजरोस खारफुटीचा बळी जात आहे.