मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखडय़ात तिवराच्या छोटय़ा छोटय़ा जंगलांचे जतन करण्याच्या बाता मारण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात विकासकांकडून मात्र मुंबईची जैवविविधता जपण्यास व किनारपट्टीची धूप रोखणास कारणीभूत ठरणाऱ्या या झाडांची उघडपणे कत्तल होते आहे. बोरिवलीत एका बिल्डरने सुमारे १०० तिवराची झाडे कापून ती जाळण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले असून याबाबत महानगरपालिकेकडे तक्रार करण्यात आली आहे.
लिंक रोडच्या धर्मानगर येथील विचारे कम्पाऊंडच्या बाजूला लागून असलेल्या तिवराच्या झाडांची मोठय़ा प्रमाणावर कत्तल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तब्बल ८० ते १२० तिवराच्या झाडांची छाटणी करून ती जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जुनी एमएचबी कॉलनी, गोखले महाविद्यालय व धर्मानगर या तिन्ही ठिकाणचे पावसाळी पाणी वाहून नेणारा मोठा नैसर्गिक नाला आहे. या नाल्यात अनधिकृतरीत्या भराव टाकून त्याचा मार्ग बदलण्यात आला आहे. तसेच येथील तिवरांची कत्तल करून या ठिकाणी अनधिकृतरीत्या भरणी केल्याचे निदर्शनास येत आहे. याचा मोठा आघात येथील पर्यावरण व्यवस्थेवर होतो आहे. या पद्धतीने अनधिकृत काम करून येथील एका विकासकाचा ‘सीआरझेड’बाधित जमिनीवर बंगला बांधण्याचा प्रयत्न आहे.
या भागात भरणी करताना ८० ते १२० तिवराच्या झाडांची कत्तल करण्यात आली. त्यामुळे सरकारने या विकासकाला २ कोटी रुपयांचा दंड आकारला. परंतु पुढे हे प्रकरण दाबण्यात आल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक शिवा शेट्टी यांनी केला.
आताही हा विकासक अनधिकृपणे या भागात मनमानीपणे बदल करीत आहे. याचे दुष्परिणाम या भागातील नागरिकांना भोगावे लागण्याची शक्यता असल्याने आपण या संदर्भात पालिकेकडे तक्रार करीत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. शेट्टी यांनी पालिकेच्या आर-मध्य विभागाबरोबरच तहसीलदार, जिल्हाधिकारी व एमएचबी पोलीस ठाण्यात या प्रकाराची तक्रार केली आहे; परंतु तक्रार करून बरेच दिवस उलटूनही यासंबंधी दोषींवर कारवाई झालेली नाही, असा आरोप शेट्टी यांनी केला.