सराफाला लुटण्यात आलेल्या गुन्ह्य़ाची चौकशी करीत असतांना येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने इचलकरंजीतील अल्पवयीन मुलीच्या खुनाचा धक्कादायक प्रकार बुधवारी सायंकाळी उघडकीस आणला. कोमल पवार असे मुलीचे नांव आहे. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी प्रेमप्रकरणातून खून केल्याची कबुली दिली आहे. तब्बल अडीच महिन्यानंतर शहापूर येथील खणीतून सडलेला मृतदेह आज बाहेर काढण्यात आला.
इचलकरंजीनजीक रूई गावातील एका सराफाला चोरटय़ांनी चार लाखाला गंडा घातला होता. याप्रकरणी संशयितांच्या वर्णनावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने इचलकरंजीतील विक्रमनगरातील संशयितांकडे चौकशी सुरू केली होती. सुखदेव चांगदेव डावरे, अमर आनंदराव बगाडे, नीलेश चंद्रकांत नरळे यांच्याकडे तपास करीत असतांना वेगळेच प्रकरण पुढे आले. या तिघांनी ते राहत असलेल्या भागातील कोमल नारायण पवार या मुलीचा खून करून मृतदेह शहापूर खणीत टाकल्याची कबुली दिली. त्याप्रमाणेआज पोलीस उपअधीक्षक प्रकाश देशमुख, पोलीस निरीक्षक सयाजी गवारे, रामदास इंगवले यांनी शहापूर खणीची पाहणी केली. जीवरक्षक दिनकर कांबळे यांच्या मदतीने मृतदेह खणीबाहेर काढला.
पोलिसांनी सांगितले की, कोमल पवार ही तीन महिन्यापूर्वी आईशी भांडून घर सोडून निघून गेली होती. तिचे सुखदेवशी प्रेमसंबंध होते. नंतरच्या काळात अमर बगाडे याच्याशी तिचे सूत जुळले. कोमलने विवाह करण्याची गळ घातली, मात्र दोघांनीही दाद दिली नाही. त्यातूनच तिघांनी तिचा गळा दाबून खून केला व मृतदेह शहापूरखणीत टाकला होता.