यश पॅलेस ते कोठी या रस्त्याच्या कामाची महापौर संग्राम जगताप यांनी शुक्रवारी पाहणी केली. बराच काळ रेंगाळळेल्या या कामाला चालना देण्यासाठी येथील अडथळे तातडीने दूर करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.
महानगरपालिकेचे आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या समवेत जगताप यांनी आज या रस्त्याची पाहणी केली. नगरसेवक गणेश भोसले, विपुल शेटिया, डॉ. विजय भंडारी, नगररचनाकार विश्वनाथ दहे, कामाचे कंत्राटदार महेश परमानी आदी यावेळी उपस्थित होते.
शहरातील या महत्वाच्या रस्त्याचे काम बराच काळ रेंगाळले आहे. या रस्त्याचे काम सुरू असले तरी या मार्गावर अनेक अडथळे अजूनही आहेत विशेषत: विजेचे खांब, त्याची डीपी असे अडथळे तातडीने दूर करण्याचे आदेश जगताप यांनी दिले. शहरात सध्या सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे कामही सुरू आहे. या रस्त्याचे काम सुरू असतानाच येथील हे कामही डांबरीकरणाच्या आधी पुर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पिण्याच्या जलवाहिनीच्या कामाचीही त्यांनी माहिती घेतली. सध्या येथे गटारींचे काम सुरू आहे. आयुक्त कुलकर्णी यांनीही या रस्त्यावरील अडथळे तातडीने दूर करण्याचे आदेश संबंधित विभागप्रमुखांना दिले. रस्त्याचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी स्थानिक रहिवाशी व दुकानांमध्ये जाण्या-येण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून त्यांचंी गैरसोयही तातडीने दूर करण्याच्या सूचन यावेळी देण्यात आल्या.