लोकसभा निवडणुकीत महायुतीमागे उभी राहिलेली जनता विधानसभा निवडणुकीतही उभी राहील किंवा नाही याविषयी निश्चित सांगता येत नसले तरी राज्यातील सत्ताधाऱ्यांची कामगिरी पाहता महायुतीत प्रवेश करण्यासाठी रीघ लागल्याचे चित्र येवला मतदारसंघातही दिसत आहे. येवला मतदारसंघ शिवसेनेच्या वाटय़ाला असल्याने सेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले जात असल्याने निष्ठावंत इच्छुकांमध्ये काहीशी नाराजी दिसून येत आहे. अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केलेले संभाजी पवार हे शिवसेनेचे उमेदवार असतील की माजी आमदार कल्याणराव पाटील याविषयी संदिग्धता असताना खुद्द कल्याणरावांनी ज्येष्ठ नेते मारोतराव पवार यांनाच शिवसेनेकडून उमेदवारी करण्याचे आवतण दिल्याने आणि त्यांनी नकार दिल्यास आपण उमेदवारी करणार असल्याची घोषणाही केल्याने उमेदवारीचा तिढा अधिकच जटिल होत असताना ज्यांच्याविरोधात लढण्याची ही तयारी होत आहे ते पालकमंत्री छगन भुजबळ मात्र शांतपणे हा सर्व प्रकार पाहात आहेत. आपण येवल्यातून उमेदवारी करणार की नाही याविषयी अद्याप भुजबळ यांनी निश्चित काहीही जाहीर न केल्याने राष्ट्रवादीचा उमेदवार कोण हे अजून तरी गुलदस्त्यातच म्हणावे लागेल.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही भाजप-सेनेला यश मिळेल हे गृहीत धरून काँग्रेस, राष्ट्रवादीतील मंडळी आता भाजप, सेनेत प्रवेश करू लागली आहे. दशकापासून येवला-लासलगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. परंतु नाशिक लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून आता भुजबळ येवल्यातून उमेदवारी करणार काय, अशी चर्चा महिन्यापासून सुरू झाली आहे. दस्तुरखुद्द भुजबळ यांनी जनमत घेऊनच उमेदवारीविषयी निर्णय घेण्यात येईल असे सांगितल्याने भुजबळ स्वत:ची परीक्षा घेत आहेत की आपली असा प्रश्न मतदारांसमोर उभा ठाकला आहे.
दुसरीकडे दहा वर्षांपासून भुजबळांच्या झंझावातापुढे नतमस्तक झालेले भाजप आणि शिवसेनेतील नेते लोकसभा निवडणुकीत भुजबळ पराभूत होताच कात टाकून ताजेतवाने झाले आहेत. एवढय़ावर न थांबता विधानसभेसाठी उमेदवारी मिळण्याचा अवकाश आपला विजय निश्चित असल्याचे स्वप्नही पाहू लागले आहेत.
अलीकडेच शिवसेनेत आलेले संभाजी पवार यांनी उमेदवारी गृहीत धरून किंबहुना शिवसेना प्रवेशाअगोदरच प्रचार दौरा आणि वैयक्तिक गाठीभेटी सुरू केल्याने इतर इच्छुक अवाक झाले आहेत. पंढरीनाथ थोरे, नरेंद्र दराडे, भास्कर कोढरे, राजेंद्र लोणारी यांचा समावेश इच्छुकांमध्ये आहे. माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी तर येवल्यातून भुजबळांविरोधात उमेदवारी करणारच असे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. एकंदरीत शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी होत असताना आता एकमेकांचा पत्ता कट करण्याची स्पर्धादेखील सुरू झाल्याचे निदर्शनास येत आहे. माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी माजी आमदार मारोतराव पवार यांना उमेदवारी करण्याचे आवाहन केले आहे. मारोतरावांनी अर्जुनाची भूमिका घ्यावी असा सल्ला दिला आहे. मारोतरावांनी अर्जुनाची भूमिका घेतल्यास आपण सारथी कृष्ण होण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याच वेळी संभाजी पवार यांसारख्या पोराटोरांनी अभिमन्यू होऊ नये असा सल्ला देत एकंदरीत संभाजी पवार यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. मारोतरावांनी उमेदवारी न केल्यास आपण उमेदवारी करणारच असा निश्चयही त्यांनी जाहीर केला आहे. दुसरीकडे भाजपमध्येही ‘एकला चलो’चे वारे वाहू लागले असून प्रमोद सस्कर, आनंद शिरे, कैलास सोनवणे, अ‍ॅड. कुलकर्णी तर काँग्रेसमधून ज्येष्ठ नेते तात्या लहरे यांच्या नावाची चर्चा आहे. ज्यांच्याविरोधात उमेदवारी करण्याची हे सर्वजण तयारी करीत आहेत ते भुजबळ मात्र शांत आहेत. आपल्याविरोधात होत असलेला उमेदवारीचा घोळ पाहून स्वत:चे मनोरंजन करून घेत आहेत. आपल्याविरोधात एकंदर किती उमेदवार राहतील याचा निश्चित अंदाज आल्यानंतरच भुजबळ हे आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.