ऐरोली येथील महावितरण (एमएसईबी) वसाहतीमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता येथे राहणे नको अशी भावना निर्माण झाली आहे.  वसाहतीमध्ये कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले असून कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रश्नाकडे महापारेषणचे अधिकारी जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे.
वसाहतीत सध्या अ,ब,क,ड श्रेणीतील सुमारे ५०० कर्मचारी वास्तव्यास आहेत. या ठिकाणी महापारेषणच्या माध्यमातून इमारतीना नागरी सुविधा पुरवल्या जातात. मागील काही वर्षांपासून येथे वसाहतीत राहत नसलेले, परंतु या ठिकाणी असलेल्या कार्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने वसाहतीतील मलनिस्सारण वाहिन्यांची दुरवस्था झाली आहे. प्रत्येक इमारतीच्या खाली साचलेले कचऱ्याचे ढीग, रस्त्यावर पडलेले पारेषण कामाचे साहित्य, तुंबलेले गटार, पिण्याच्या पाण्याच्या अस्वच्छ टाक्या आदी समस्यांनी या वसाहतींना विळखा घातला आहे. पावसाळयात येथे वाढलेल्या झाडीमुळे डांसाची आणि मच्छरांची प्रमाण लक्षणीय वाढल्याने रहिवाशांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. जनसेवेसाठी कार्यरत असणाऱ्या महापारेषणच्या कर्मचाऱ्याच्या वसाहतीमधील अस्वच्छतेमुळे त्यांचे कुटुंबीय संतापले आहेत. महापारेषणला दरमहा घरभाडे देऊनही या नागरी सुविधा मिळत नसल्याने वसाहतीत वास्तव्य नकोच असा तगादा कुटुंबीयांनी कर्मचाऱ्यांकडे लावला आहे. ही बाब अधिकाऱ्यांच्या नजरेस आणूनही यावर तोडगा निघत नसल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.  पावसाळयापूर्वी या ठिकाणी असणाऱ्या नाल्यांची सफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचून डांसाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आजाराचे प्रमाणदेखील वाढले असून वरिष्ठ अधिकारी सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा बळी जाण्याची वाट पाहत आहेत का, असा सवाल येथील महिलांनी उपस्थित केला आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी कार्यकारी अभियंता संदीप वेंगुर्लेकर यांच्याशी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे देत माहिती देण्यास टाळाटाळ केली.
अजित पवार यांच्या स्वागतासाठी लाखोची उधळण
महावितरण वसाहतीत एका कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आले असताना महापारेषणने रस्त्यांची रंगरंगोटी, साफसफाई करून परिसर स्वच्छ ठेवला होता. यासाठी महापारेषणने लाखो रुपयांची उधळणदेखील केली. मात्र सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी निधी नसल्याचे कारण पुढे केले जाते.
सुरक्षा यंत्रणा कुचकामी
या ठिकाणी लोखंड साहित्यांमुळे भंगार चोरटय़ांचा सुळसुळाट असून मोठय़ा चोरीच्या घटना घडत असतात. वर्षांपूर्वी भंगार चोरटय़ांनी केलेल्या हल्ल्यात पोलीस कर्मचारी गोपाळ सौंदाणे यांना प्राण गमवावे लागले. त्यांनतर या ठिकाणी संरक्षक भिंती उभारणे, सर्वत्र सीसीटीव्ही बसवणे, गस्तीपथक तयार करणे अनिवार्य असताना त्यांचीदेखील पूर्तता महापारेषण विभागाकडून करण्यात आली नसल्याने सुरक्षेचे बारा वाजले आहेत.  

महापारेषणच्या कॉलनीमध्ये सध्या असुविधांचा घेराव आहे. ही बाब मला आताच माहीत झाली आहे. याबाबतचे सर्वेक्षण करून नागरी सुविधांची पूर्तता करण्यात येईल.
 -अविनाश कसबेकर, अधीक्षक अभियंता, महापारेषण