शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांची चिखलमय मातीमुळे धोकादायक अवस्था झाली असून त्याचे प्रत्यंतर शुक्रवारी द्वारका परिसरातून टाकळीकडे जाणाऱ्या चौकात आले. उड्डाणपुलाच्या खालील रस्ता चिखलमय झाल्यामुळे अनेक दुचाकी वाहनधारकांचा कपाळमोक्ष झाला. अपघातात गंभीर स्वरुपाच्या दुखापती झालेल्या वाहनधारकांना रुग्णालयाचा रस्ता पकडावा लागला. महात्मा गांधी रोड, गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालयासमोरील परिसर या चिखलमय रस्त्यावर वाहनधारकांना अशीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात दुचाकी घसरून अनेक छोटे-मोठे अपघात घडत असून त्यांना जबाबदार कोण, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. पावसाळ्याच्या हंगामात रस्तोरस्ती पडणारे खड्डे नाशिककरांना काही नवीन नाहीत. परंतु, यंदा खड्डय़ांबरोबर शहरातील काँक्रीटीकरण व डांबरीकरण केलेले रस्ते चिखलमय झाले आहेत. या मार्गांवरून वाहन चालविण्याची कसरत वाहनधारकांना करावी लागत आहे. शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लांबलचक उड्डाणपुलाचे काही दिवसांपूर्वी उद्घाटन करण्यात आले. हे उद्घाटन करताना त्याखालील रस्त्यांची कामे पूर्णत्वास गेली की नाही, याची तसदी घेण्यात आली नसल्याचा स्थानिकांचा आक्षेप आहे. त्याची परिणती अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, रस्त्यावर आलेला चिखल यात झाल्याचे दिसत आहे. उड्डाणपुलाखालील रस्त्यावरून टाकळीकडे जाणाऱ्या चौकात शुक्रवारी ही बाब पहावयास मिळाली.
टाकळीरोड परिसरात मोठी नागरी वस्ती आहे. स्थानिकांना जा-ये करण्यासाठी प्रामुख्याने याच मार्गाचा वापर करावा लागतो. उड्डाणपुलाखालील चौकातील रस्ता शुक्रवारी चिखलमय झाला. महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने माती सव्‍‌र्हीस रोडवर येणार नाही, याची दक्षता घेतली नाही. यामुळे रिमझिम पावसात रस्त्याचा हा भाग चिखलमय बनला. त्याची कल्पना नसलेल्या काही दुचाकी वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागले. चिखलमय रस्त्यावर अनेकांच्या दुचाकी घसरल्या. त्यात महिला, पुरूष व विद्यार्थी किरकोळ प्रमाणात जखमी झाले. ज्यांना अधिक दुखापत झाली त्यांना रुग्णालयात जावे लागले. रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे निर्माण झालेली धोकादायक स्थिती मार्गस्थ होणाऱ्या अग्निशमन दलाच्या पाण्याच्या बंब चालकाच्याही लक्षात आली. त्यांनी मग रस्त्यावरील हा चिखल पाण्याचे फवारे मारून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात यश आले नाही. त्यानंतर संबंधित कंपनीने यंत्रणेच्या सहाय्याने हा चिखल बाजुला सारला. चौकातील साफसफाई होईपर्यंत अनेक वाहनधारकांना नाहक धडपडावे लागले. प्रभाग क्रमांक ३० मध्ये घडलेल्या या प्रकाराबाबत नगरसेवक सचिन मराठे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित कंपनीने माती रस्त्यावर येणार नाही, याची दक्षता घेतली नसल्याचा आरोप केला. उड्डाणपुल व त्याखालील रस्त्यांची कामे पूर्ण न केल्यामुळे स्थानिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार सांगुनही संबंधित कंपनी दखल घेत नसल्याची तक्रार केली. दरम्यान, असाच प्रकार काही दिवसांपूर्वी दहीपुलाकडून मेहेरकडे येणारा रस्ता आणि गंगापूर रस्त्यावरील केटीएचएम महाविद्यालयासमोर घडला होता. या मार्गावर ठिकठिकाणी माती सांडल्यामुळे रिमझिम पावसात त्यांची अवस्था बिकट झाली. या मार्गांवरून मार्गक्रमण करताना असेच छोटे-मोठे अपघात ही नित्याची बाब झाली आहे. परंतु, ज्या घटकांनी चांगल्या रस्त्यांची ही स्थिती केली, त्यांच्यावर पालिकेने कोणतीही कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. मध्यंतरी राज ठाकरे यांनी रस्त्यांच्या कडेला साचलेले मातीचे ढीग त्वरीत दूर करण्याची सूचना केली होती. त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.