वाशीस्थित नवी मुंबई स्पोर्ट्स असोशिएशनची आठवी पंचवार्षिक निवडणूक लोकसभा निवडणूक निकालाच्या नऊ दिवसांनी होत असून जवळपास १०० कोटी रुपयांच्या क्लबवर शहरातील अनेक मान्यवरांचा डोळा आहे. या क्लबच्या कार्यकारिणीवर वर्णी लागावी यासाठी अनेक सदस्यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.
सहा हजार २०० मतदार असणाऱ्या या क्लबचे भवितव्य मात्र एक हजार सभासद ठरवीत असल्याची बाब पुढे आली आहे. दरम्यान, सर्व सदस्यांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर मतदान प्रक्रिया व तारीख कळविण्यात आली असल्याचे उपाध्यक्ष डॉ. दिलीप राणे यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर शरीराचा शीण घालविण्यासाठी सभासदांना हुकमी ठिकाण असणाऱ्या नवी मुंबई स्पोर्ट्स असोशिएशनची २५ मे रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळेत मतदान होणार आहे.
क्लबचे मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे परिसरात एकूण सहा हजार २०० सदस्य अर्थात मतदार आहेत, पण यांपैकी ९० टक्के सदस्य हे मतदानाच्या दिवशी फिरकतदेखील नाहीत. शहरातील जुना क्लब असणाऱ्या या क्रीडा संकुलाचे अनेक मान्यवर सभासद आहेत.
सर्व प्रकारच्या खेळांना या संकुलात सध्या वाव दिला जात असून एक नामांकित क्लब म्हणून हा सर्वाना परिचित आहे. सात कोटींचा कॉर्पस, १५ कोटींचा राखीव, दहा कोटींच्या ठेवी अशा या शहरातील श्रीमंत क्लबला सिडकोने ८० च्या दशकात कवडीमोल दराने २२ एकर जमीन दिली आहे.
पाच वर्षांनी होणाऱ्या या क्लबच्या निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या एखाद्या पॅनलमध्ये आपली वर्णी लागावी यासाठी अनेक सदस्य जिवाचा आटापिटा करताना दिसून येतात. या वेळी विद्यमान उपाध्यक्ष डॉ. दिलीप राणे यांचे राणे पॅनल केवळ निवडणूक रिंगणात असून त्यांच्यासमोर दुसरे पॅनल उभे राहू शकले नाही. त्यामुळे उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे नेते विठ्ठल मोरे यांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे ‘अब की बार, राणे-मोरे सरकार’ अशा घोषणा सदस्यांमध्ये रंगल्या आहेत. मोरे यांनी ही निवडणूक पारदर्शकरीत्या होत नसल्याची तक्रार निवडणूक व निबंधकांकडे केली आहे.
अगोदरच आठ महिने उशीर झालेली निवडणूक लवकरात लवकर घेण्यात यावी यासाठी सिडको, पालिका, कोकण विभागाकडे गेली तीन महिने निवडणूक अधिकारी मागितला जात आहे. त्यांनी दुर्लक्ष केल्याने क्लबने समितीच्या संमतीने निवृत्त निबंधकांना निवडणूक अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. त्यानुसार निवडणुकीची सर्व प्रक्रिया पारदर्शक करण्यात आली असून मतदारांना घरपोच पत्रके तसेच सोशल मीडियाद्वारे पाठविण्यात आलेली आहेत. दीड महिना अगोदर निवडणुकीची नोटीस जाहीर करण्यात आल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.