लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांतच होणार आहेत. त्यामुळे सहा महिन्यांवर असलेल्या निवडणुकांसाठी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळीच अनेक इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंगे बांधली असून पत्रकारांना कोपऱ्यात घेऊन, त्यांचा खिसा गरम करून मला अधिक प्रसिद्धी दे, मी विधानसभेचा उमेदवार असल्याचे सांगत आहेत. यामुळे अनेक इच्छुकांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातात स्वत:ची प्रसिद्धी करण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र आहे.
उरण विधानसभा मतदारसंघात शेकाप-शिवसेना युतीची ताकद ही निर्णायक होती. त्यामुळे या मतदारसंघात या युतीलाच विजय मिळणार असे चित्र होते. असे असले तरी भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या नेत्याने आपण ही विधानसभा निवडणूक लढविणार असा इशारा अनेकदा दिला होता.
शेकाप- शिवसेना यांच्या युतीत ग्रामपंचायत निवडणुकीतच मतभेद निर्माण झालेले होते. त्यातच शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेसोबतची युती तोडून मनसेबरोबर युती केल्याने उरण विधानसभा मतदारसंघातील चित्र बदलले आहे. त्यामुळे काँग्रेसने मात्र युतीत फूट पडल्याने आपल्याला एकगठ्ठा मते मिळतील आणि आपला विजय निश्चित असल्याचे गणित मांडण्यास सुरुवात केली आहे. सेना-भाजपामधील मोठा भिडू म्हणून शिवसेनेचा हक्क असताना भाजपा करीत असलेला दावा, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असली तरी राष्ट्रवादीच्या एका नेत्याने निवडणूक लढविण्याचे दिलेले संकेत, त्याचप्रमाणे उरण मतदारसंघाला स्थानिक उरणचा उमेदवार असावा अशी भूमिका घेऊन लढू इच्छिणाऱ्या अनेकजणांनी गुडघ्याला बाश्िंागे बांधलेली आहेत.