समाज माध्यमांच्या प्रभावाने धास्तावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने या विषयावर शुक्रवारी आयोजिलेल्या कार्यशाळेकडे बहुतांश कार्यकर्त्यांनी पाठ फिरविल्याचे पहावयास मिळाले. उत्तर महाराष्ट्र विभागस्तरीय कार्यशाळा असूनही सभागृहात गर्दी जमविता जमविता पदाधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले. सामाजिक माध्यमांचा सकारात्मकपणे उपयोग कसा करता येईल, याचे धडे कार्यकर्त्यांना कार्यशाळेतून देण्यात आल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले. या माध्यमांचा काही घटकांकडून चुकीच्या गोष्टींसाठी वापर होत आहे. या संदर्भात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करण्यात तांत्रिक ज्ञानाअभावी पोलीस यंत्रणेला विलंब लागतो. यामुळे ही यंत्रणा बळकट करण्यासाठी गृहमंत्र्यांना साकडे घातले जाईल, असेही सुळे यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी युवक, युवती आणि विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी परशुराम साईखेडकर नाटय़गृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळा सुरू होण्याची वेळ सकाळी दहाची असली तरी अकरा वाजेपर्यंत सभागृह रिक्त होते. सभागृह रिकामे असल्याने ताईंनी तासभर कार्यक्रमस्थळी येणे टाळल्याची चर्चा सुरू होती. अखेर खा. सुळे यांचे आगमन झाल्यावर सभागृहात काहीअंशी गर्दी झाली. पण, मागील चार ते पाच रांगा आणि बाल्कनी रिक्त होती. बहुदा यामुळे सुळे यांनी सभागृहात फार वेळ दवडला नाही. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष अर्जुन टिळे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या विभागीय संघटक अमृता पवार आदी उपस्थित होते. सामाजिक माध्यमांचे ज्ञान युवा पिढीला देण्यासाठी राष्ट्रवादीने आधी औरंगाबाद, पुणे व कराड येथे या स्वरुपाच्या कार्यशाळांचे आयोजन केले आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी या माध्यमांचा आधिक्याने वापर केला. या माध्यमांचा चुकीच्या गोष्टींसाठी वापर झाला. अशा काही गोष्टी या माध्यमावर घडत असल्यास आपण काय करू शकतो, त्याचा सकारात्मक कसा वापर करता येईल, या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आल्याचे सुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सामाजिक माध्यमांवर घडणाऱ्या गुन्ह्यांचे निराकरण पोलिसांच्या सायबर सेलकडून होण्यास विलंब लागत असल्याच्या प्रश्नावर सुळे यांनी त्या विभागात तंत्रज्ञांची कमतरता आहे काय, याबद्दल गृहमंत्र्यांनी चर्चा केली जाईल असे सांगितले. एका सुसंस्कृत समाजाची निर्मिती करण्यासाठी या माध्यमाचा कसा वापर होईल या दृष्टिकोनातून कार्यशाळेत मार्गदर्शन केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्येष्ठ पत्रकार संजीव लाटकर यांनी विधानसभा निवडणुकीत या माध्यमांचा कसा वापर करावा तसेच युवक व युवतींना या माध्यमातून पक्षाशी कसे जोडता येईल यावर माहिती दिली. तरुणाईने या माध्यमाचा विधायक वापर कसा करावा याबद्दल नितीन वैद्य यांनी मार्गदर्शन केले.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादंगाची चर्चा
सामाजिक माध्यमे या विषयावरील कार्यशाळेच्या नियोजनात शहर पदाधिकाऱ्यांना वगळण्यात आल्याच्या मुद्यावरून जिल्हाध्यक्ष आणि इतर काही पदाधिकाऱ्यांमध्ये वादविवाद झाल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती. पुढे हा वाद राष्ट्रवादी भवनपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जाते. परंतु, तिथे वादाचे कारण वेगळेच होते, असेही समजते. या संदर्भात जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले. कार्यशाळा एकदम उत्साहात व नियोजनबद्धपणे पार पडल्याचे त्यांनी सांगितले.