जिल्हा परिषदेत, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अत्यंत बेशिस्त वाढली असून शाळा सोडल्यानंतर अनेकांना राष्ट्रगीतही आठवत नाही वा पूर्ण म्हणताही येत नाही. राष्ट्रगीत आपल्याला प्रेरणा देते, तसेच त्यामुळे शासकीय कामकाजात शिस्त लागेल, या विचारांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार यांनी जिल्हा परिषद व संबंधित संस्थांमध्ये देशभक्तीपर गीतांनी कामकाजाची सुरुवात करण्याची योजना आखली. पण, काही अधिकारी व पदाधिकाऱ्यांचाही याला विरोध होत असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेत देशभक्तीपर गीतांनी कामाला सुरुवात करून राष्ट्रगीत म्हणण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक विभाग काम सुरू करेल, अशी ही योजना आहे. राष्ट्रगीताला प्रत्येकास हजर राहावेच लागते. त्यामुळे कामचुकारांच्या जिव्हारी ही बाब लागली असून ते यास विरोध करीत असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषदेत नोकरी करतानाच राजकीय नेत्यांशी संबंध ठेवणाऱ्या कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला कामावर केव्हाही गेले तर चालते. शिवाय, आपणास राजकीय पाठिंबा असल्यामुळे आपले काही बिघडत नाही अशी अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांची समजूत झाली आहे. त्यामुळे ते शासनाचे भरमसाठ वेतन घेऊन काम करीत नाहीत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. नोकरी लागण्यापूर्वी या सर्व गीतांचा उपयोग करायचा पण, नंतर मात्र ते म्हणणे टाळायचे, असा एक प्रवाह आहे.
आपल्या या कल्पनेला राजकीय, तसेच अधिकारी वर्गही विरोध करीत ईहेत. राष्ट्रगीतासाठी प्रत्येकाला कामावर वेळेवर यावे लागेल म्हणून अनेकांचा विरोध होत असल्याचे जावेद इनामदार म्हणाले. येत्या २३ सप्टेंबरपासून कर्मचाऱ्यांना राष्ट्रगीतासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेतील कामकाजाबाबत सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात असून कर्मचारी जागेवर राहत नाहीत. त्यामुळे कामे वेळेवर होत नाहीत, अशा ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. अनेक कर्मचारी मन मानेल तेव्हा येतात व केव्हाही बाहेर जातात, हे दररोजचे चित्र आहे. नागरिकांनाही राष्ट्रप्रेम वाटत नाही. राष्ट्रगीताचा तर विसरच पडलेला आहे. राष्ट्रगीताचा प्रभाव पडून आपल्या भावना  राष्ट्रासाठी काम करण्याच्या होतील व सर्व कामे ठीक होऊ लागतील, अशा विश्वासाने इनामदार यांनी ही कल्पना मांडली आहे. जिल्हा परिषदेच्या कामाची सुरुवात करताना ‘इतनी शक्ती हमे देना दाता’, ‘ऐ मालिक तेरे बंदे हम’ व साने गुरुजींचे ‘खरा तो एकची धर्म’ ही गीते कर्मचाऱ्यांना म्हणावी लागतील व त्यानंतर राष्ट्रगीत होऊन सर्व कामकाज सुरू होईल, असे ते म्हणाले.
हाच उपक्रम महाविद्यालयातही राबविण्याबाबत आपणास दूरध्वनीवरून सांगण्यात आले आहे. राष्ट्रगीताला विरोध म्हणजे देशद्रोह आहे. कोणी कर्मचारी उशिरा आला तर त्याला आपण दंड केला आहे व तो दंड म्हणजे उशिरा येणाराने एकटय़ानेच राष्ट्रगीत म्हणून कामाला सुरुवात करावी, असे इनामदार म्हणाले.