मराठा आरक्षणासाठी समाजातील सर्व संघटनांनी कायम एकजूट दाखवून एकाच झेंडय़ाखाली येऊन लढण्याची गरज आहे. नारायण राणे समितीला ठोस पुरावे सादर करून समितीचा अहवाल आल्यानंतर आपण पुढची भूमिका जाहीर करू, असे प्रतिपादन कोल्हापूर संस्थानचे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले. छत्रपती शिवाजीमहाराजांचा राज्याभिषेक सोहळा राष्ट्रीय सण म्हणून जाहीर व्हावा यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
संभाजी सेनेतर्फे येथे रविवारी आयोजित मराठा आरक्षण महामेळाव्याचे उद्घाटन छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष माजी मंत्री सुरेश वरपूडकर, आमदार संजय जाधव, महापौर प्रताप देशमुख, माजी आमदार विजय गव्हाणे, संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव रबदडे, बाळासाहेब मोहिते, संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर िशदे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, विनोद भोसले, प्रा. अनंतराव शिंदे आदींची उपस्थिती होती.
छत्रपती संभाजीमहाराज म्हणाले की, मराठा समाजाची अवस्था आज बिकट आहे. मूठभर मराठा समाज ऐशारामात जगत असला, तरी अन्य मराठे मात्र दारिद्रय़ाच्या खाईत लोटले आहेत. मराठा समाजाला वर आणण्यासाठी आरक्षणाची नितांत गरज आहे. आरक्षणासाठी मराठा समाज जागा झाला असून, राज्यकर्त्यांना जागे करण्याची गरज आहे. मराठा समाजाची आरक्षणाविना होणारी परवड पाहून आरक्षणाच्या मुद्दय़ावर आपण राजवाडय़ाबाहेर पडलो, असे संभाजीमहाराज म्हणाले. लवकरच महाराष्ट्रात नारायण राणे समिती फिरणार आहे. समितीला मराठा संघटनांनी आरक्षण संदर्भातील सर्व पुरावे सादर करावे. या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढची भूमिका ठरवू. आरक्षणाचा मुद्दा हा राजकारणापुरताच मर्यादित नसून इतर बाबींसाठीही आवश्यक आहे, असे सांगत वरपुडकर यांनी आरक्षणामुळे शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल, असे सांगितले.
गव्हाणे यांनी मराठा आरक्षणाला मराठा राज्यकर्त्यांचीच आडकाठी असल्याने आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही. समाजहितासाठी सत्तेवर पाणी सोडण्यासाठी अनेक महापुरुष झाले. पण मराठा समाजातल्या पुढाऱ्यांनी सत्तेसाठी समाजालाच सोडून दिल्याचे चित्र आहे. राजकारणाने मराठा समाजाचा घात केला. सर्व पुढाऱ्यांनी आरक्षणाचे राजकारण न करता समाजहितासाठी एकत्र येऊन आरक्षण मिळवून द्यावे, असे आवाहन गव्हाणे यांनी केले. आमदार जाधव, शिरसाठ, रबदडे यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक रामेश्वर िशदे, तर प्रा. सुनील तुरूकमाने यांनी सूत्रसंचालन केले.