मराठा समाजास शिक्षण व नोक-यांमध्ये स्वतंत्र २५ टक्के आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने १६ जूनला नगरला‘मराठा आरक्षण मेळावा व‘मराठा दरबार आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्य़ातील तिन्ही मंत्री, विविध पक्षांतील मराठा आमदार, खासदार, नेत्यांनी या मेळाव्यात येऊन आरक्षणास पाठिंबा द्यावा, अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे, असा इशारा संघाने दिला आहे.
संघाचे प्रदेश संघटक डॉ. कृषिराज टकले यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संघाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज नगरमध्ये झाली, त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला. मराठा आरक्षण संघर्ष समितीचे प्रदेश संघटक डॉ. प्रल्हाद पाटील, दक्षिण जिल्हाध्यक्ष गणेश जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र सावंत, कार्याध्यक्ष मनोज थोरात, उत्तर जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गागरे, दक्षिण जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र धनवट आदी उपस्थित होते. संघाच्या उत्तर जिल्हाप्रमुखपदी अनिल थोरात, मराठा विद्यार्थी सेनेच्या उत्तर जिल्हाप्रमुखपदी अनिल थोरात, दक्षिण जिल्हाप्रमुखपदी प्रशांत कलापुरे यांची नियुक्ती करण्यात आली.
मेळाव्यास संघाचे संस्थापक विजयसिंह महाडिक, संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, शंभूराजे युवा क्रांतीचे अध्यक्ष सुनील मोरे आदी उपस्थित राहणार आहेत. संघाच्या या मागणीस मराठा समाजातील १३ संघटनांनी अनुकूलता दर्शवली आहे, त्यांनाही मेळाव्यास निमंत्रित करण्यात आले आहे.
सभा उधळून लावणार
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे, या समितीने केंद्र सरकारकडे २५ जूनपूर्वी अनुकाल अहवाल न पाठवल्यास आंदोलन केले जाईल. समितीमध्ये पालकमंत्री बबनराव पाचपुते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात सदस्य आहेत, त्यांच्या सभाही उधळून लावल्या जातील, असा इशारा डॉ. टकले यांनी दिला.