छेडछाड, अत्याचार, गरिबी या नेहमीच्या प्रश्नांबरोबरच खासदार सुप्रिया सुळे यांना शुक्रवारी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका काय, असा थेट सवाल राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच विभागीय मेळाव्यात केला. बहुतांश कार्यकर्त्यांनी आरक्षण न मिळाल्यामुळे मराठा समाजासमोर येणाऱ्या अडचणींचे विस्ताराने विवेचन केले व आरक्षण मिळायलाच हवे, अशी आग्रही मागणी केली. आर्थिक निकषावर मराठा समाजातील व्यक्तींना आरक्षण मिळायला हवे, अशी पक्षाची भूमिकाही जाहीर करण्यात आली. मेळाव्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी होता. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांत हा मुद्दा प्रचाराचा प्रमुख भाग असू शकतो काय, असा प्रश्न मेळाव्यानंतर पत्रकार बैठकीत सुळे यांना विचारण्यात आला आणि त्यांनी मात्र हा मुद्दा केंद्रस्थानी असणार नाही, असे सांगितले.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात ग्रामीण भागातून आलेल्या अनेकींनी मनोगते व्यक्त केली. अंबड तालुक्यात एका मुलीची टारगट मुलाने छेड काढली. या मुलीने या प्रकाराचा अनुभव सांगितला. वडिलांनी या मुलाविरोधात फिर्याद दिली. वडिलांनी दिलेल्या पाठबळाचे व्यासपीठावरून कौतुक झाले. बलात्कार करून कायद्याच्या भाषेत अल्पवयीन ठरणाऱ्या आरोपींनाही फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणीही करण्यात आली. मेळाव्यात प्रामुख्याने मराठा आरक्षणाची मागणी मुलींनी लावून धरली. आरक्षणामुळे शैक्षणिक शुल्कात सवलत मिळत नाही. त्यामुळे अनेक मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागते, असे आवर्जून सांगण्यात आले. पैठण तालुक्यातील अडुळ येथील युवतीने गरिबीमुळे शिक्षण घेताना कसा त्रास होत आहे, हे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्याच एका स्थानिक नेत्याच्या महाविद्यालयात कशी असुविधा आहे, याचाही पाढा वाचण्यात आला. एका युवतीने दारूबंदी का करत नाही, असा सवाल तर केलाच, पण दारूचे कारखाने उघडण्यासाठीच का परवानगी दिली जाते, अशीही विचारणा केली.
मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर मुली व्यासपीठावर येऊनही मते मांडत होत्या आणि व्यासपीठाखालून येणारे प्रश्नही मराठा आरक्षणाभोवतीच केंद्रित झाले होते. केवळ मराठाच नाही तर काही मुलींनी मुस्लिम समाजाच्या आरक्षणाविषयीही प्रश्न उपस्थित केले. या सर्व प्रश्नांना कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी उत्तरे दिली. ते म्हणाले की, आर्थिक निकषावर आधारित आरक्षण मिळायला हवे, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे.
एकूणच विभागीय मेळाव्यात आरक्षणाचा विषय केंद्रस्थानी होता. या अनुषंगाने कार्यक्रमानंतर पत्रकार बैठकीत खासदार सुळे यांनी मराठा आरक्षण निवडणूक प्रचारात मुख्य मुद्दा नसेल, असे सांगितले. ग्रामीण भागातून मुलींची काढली जाणारी छेड ही गंभीर समस्या गेल्या वर्षभरात समोर आल्याचे त्यांनी सांगितले. कार्याध्यक्ष आव्हाड, राज्यमंत्री सुरेश धस, फौजिया खान, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे यांची उपस्थिती होती.