मराठवाडय़ातील तरुणांनी व्यावसायिकता अंगी बाळगायला हवी. मराठवाडय़ातील भूमिपुत्राला समृद्ध करण्याची जबाबदारी या भागातील प्रत्येकाची आहे, असे प्रतिपादन अभिनेता मंगेश देसाई यांनी व्यक्त केले. ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाडा जनविकास परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उस्मानाबादचे खासदार रवी गायकवाड उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये उद्योग क्षेत्रातील नितीन कदम, शिवाजीराव जाधव, साहित्य क्षेत्रातील डॉ. रवींद्र तांबोळी, सामाजिक क्षेत्रासाठी सुशीलाताई टेकाळे, कविता देशपांडे, वैद्यक क्षेत्रातील डॉ. शाहू रसाळ, मधुकर लहानकर, शिक्षणक्षेत्रातील डॉ. विद्या गाडगीळ, पत्रकारितेत कार्यरत असणारे रविकिरण देशमुख यांना गौरवण्यात आले. मंगेश देसाई यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आळशीपणा सोडून वेगवेगळ्या क्षेत्रांत करिअर घडवण्यासाठी मराठवाडय़ातून मुंबईत आलेल्या तरुणांची तारांबळ होऊ नये, यासाठी येथे त्यांच्या निवासाची व्यवस्था होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या वेळी डॉ.अशोक नांदापूकर, डॉ.अविनाश भागवत, डॉ. संतोष कदम, आण्णासाहेब टेकाळे,  आदी उपस्थित होते.