बॉलीवूड सेलिब्रिटी कलावंतांविषयी लोकांना असलेले आकर्षण लक्षात घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून कॅलेण्डरवर या सेलिब्रिटींची वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित छायाचित्रे काढून डब्बू रत्नानी कॅलेण्डर तयार करतात. फॅशन, बॉलीवूड आणि जाहिरात क्षेत्रामध्ये संकल्पनांवर आधारित कॅलेण्डर्स करण्याकडे मोठा कल दिसून येतो. हाच ट्रेण्ड आता मराठी चित्रपटसृष्टीतही येऊ लागला आहे. गेल्या एक-दोन वर्षांपासून मराठी सेलिब्रिटींना घेऊन त्यांची छायाचित्रे काढून कॅलेण्डर तयार केली जात आहेत.
मराठी सेलिब्रिटी आणि मराठी कलावंत हे नाटक, मालिका आणि चित्रपटांद्वारे मराठी प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचले आहेत. तीन-चार मराठी वाहिन्या, वृत्तवाहिन्या याद्वारे चित्रपट-नाटकांतील घडामोडी मोठय़ा प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचतात. त्याचबरोबर मराठी चित्रपटांची संख्या वाढल्यामुळे नवनवीन कलावंतांची संख्याही वाढली. महेश मांजरेकर तसेच अन्य काही चित्रपट निर्मात्यांच्या चित्रपटांनी लोकप्रियता मिळविल्यानंतर हळूहळू ग्लॅमर येऊ लागले. त्यातूनच मराठी सेलिब्रिटी कॅलेण्डरची संकल्पना साकारत गेली. नंदू धुरंधर हे गेल्या तीन वर्षांपासून वेगवेगळ्या संकल्पना घेऊन सेलिब्रिटी कॅलेण्डर तयार करीत आहेत. कलावंत, दिग्दर्शक, जाहिरात क्षेत्रातील लोकांनाही या कॅलेण्डरविषयी कुतूहल असते. मराठी संस्कृती, मराठी नाटक, मराठी सण, मराठी बाणा आणि मराठी चित्रपट आणि आता त्यापुढे जात मराठी सेलिब्रिटी कॅलेण्डर ही संकल्पना रूजते आहे. इंद्राक्षी या नावानेही आणखी एक मराठी सेलिब्रिटी कॅलेण्डर प्रकाशित केले जाते. नंदू धुरंधर यांच्या यंदाच्या वर्षीच्या कॅलेण्डरमध्ये मृणाल कुलकर्णी, सचिन, अनिकेत विश्वासराव, मानसी नाईक, संजय नार्वेकर, सई ताम्हणकर, मनिषा केळकर, सचित पाटील यांसारखे अनेक कलावंत आहेत. बॉम्बे हाय कंपनीच्या भल्या मोठय़ा शोरूम्समध्येच बहुतांशी छायाचित्रण करण्यात आले आहे.