मराठा, मुस्लीम आरक्षण वाचविण्यासाठी छावा मराठा संघटना राज्यात विधानसभेच्या १०० जागा लढविणार असून नाशिक जिल्ह्य़ात नांदगाव, येवला, चांदवडसह १२ जागी उमेदवार उभे करणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
आरक्षणाच्या संदर्भात मराठा व मुस्लीम समाजाची काँग्रेस व राष्ट्रवादीने फसवणूक केली असून कोणताही पक्ष मराठा व मुस्लीम आरक्षण न्यायालयात टिकविणार व केंद्राच्या ओबीसी यादीत पाठविणार असे म्हणत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. पण ते कायद्याच्या चौकटीत टिकेल काय, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. आरक्षणाचा ठराव सरकारने केंद्र सरकारकडे न पाठविल्याने या दोन्ही समाजास युपीएससी परीक्षेचे फायदे मिळणार नाहीत. मराठा आरक्षणाविषयी कोणतीच भूमिका न घेता धनगर आरक्षणावर शिवसेनेने पुढाकार घेतल्याचे दिसून आले. या एकूणच पाश्र्वभूमीवर असे निर्णय घेऊन आघाडी सरकारने तोंडाला पाने पुसण्याचे काम केले असल्याची टीका यावेळी करण्यात आली. मराठा, मुस्लीम आरक्षण न्यायालयात टिकविणे व केंद्राच्या ओबीसी यादीत आरक्षण प्रस्ताव पाठविणे, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारणे, शेतीला उद्योगाचा दर्जा देणे, किल्ले, गढी, स्मारक जतन करणे आदी मुद्दे या संघटनेतर्फे मांडण्यात आले.