स्टेट बँकेच्या ‘फोन बँकिंग’ सेवेत मराठीशिवाय अन्य भाषांचा वापर होत असून महाराष्ट्रात ही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीने दिला आहे.
स्टेट बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर फोन बँकिंग सेवेसाठी संपर्क साधला असता इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळी तसेच पंजाबी भाषेचा पर्याय उपलब्ध होतो. मात्र नऊ कोटी मराठी भाषिक असलेल्या महाराष्ट्रात स्टेट बँकेला मराठी भाषेचा पर्याय का देता आला नाही, ते समजू शकत नाही, असा सवाल लोकाधिकार समितीच्या पत्रकात करण्यात आला आहे. देशभरात बँकेच्या १६,५०० शाखा कार्यरत असून महाराष्ट्रात १६०० पेक्षा जास्त शाखा आहेत. स्टेट बँकेला सर्वाधिक नफा महाराष्ट्रातून मिळत असल्याचे शिवसेनेचे खासदार व लोकाधिकार समितीचे सरचिटणीस अनिल देसाई यांनी सांगितले. महाराष्ट्राची राजभाषा व कार्यालयीन भाषा मराठी असतानाही स्टेट बँकेने मराठी भाषेचा पर्याय फोन बँकिंगमध्ये उपलब्ध करून दिलेला नाही. हा पर्याय तात्काळ उपलब्ध करून न दिल्यास आंदोलन करावे लागेल, असा इशाराही अनिल देसाई व गजानन कीर्तिकर यांनी दिला आहे.