मुंबईनंतर राज्यात क्रमांक एकवर असलेल्या नागपूरच्या मराठी विज्ञान परिषदेला गटबाजीने ग्रासले असून, गेल्या काही वर्षांपासून ही संघटना मुख्य ध्येयापासून भरकटली आहे. मावळत्या वर्षांत या संघटनेची सर्वसाधारण सभा न झाल्याने संलग्नीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विज्ञानाचा प्रसार मराठी भाषेतून करणे, लोकांमध्ये वैज्ञानिक साक्षरता वाढवणे आणि वैज्ञानिक दृष्टी विकसित करणे, ही उद्दिष्ट गाठण्यासाठी परिषदेतर्फे वर्षभर विविध उपक्रम आयोजित करणे अपेक्षित आहे. परंतु गेल्या वर्षभरापासून काही आजीव सदस्यांनी वैयक्तिकरीत्या घेतलेले उपक्रम सोडल्यास कोणतेही लक्षवेधी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले नाहीत.
परिषदेच्या सदस्यांची संख्या वाढली. मात्र, विज्ञानच्या प्रसारासाठी प्रयत्न कमी झाल्याचे दिसून येत आहे. याउलट परिषदेची सूत्रे आपल्याच हाती राहावी म्हणून सदस्यांमध्ये प्रचंड चढाओढ आहे. या संघटनेत बहुतांश शिक्षक आहेत. मात्र, त्यांचे संघटनेतील वर्तन शिक्षकीपेशालाही लाज वाटेल, असे राहिले आहे. धरमपेठतील एका शाळेत झालेल्या बैठकीत परिषदेच्या सदस्यांनी एकमेकांना मारण्यासाठी खुच्र्या उचलल्या. शाब्दिक कुरघोडी तर नित्याचेच झाले आहे. यामुळे महिला सदस्यांचे आमसभेला येण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. विज्ञान प्रसारापेक्षा राजकीय खेळी खेळणाऱ्या आणि संघटनेच्या नावाचा वापर आपल्या वैयक्तिक लाभासाठी करण्याच्या प्रवृत्तीला कंटाळून एका महिला सदस्याने उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. विद्यमान अध्यक्षांनीही राजीनामा दिला आहे.
तीन वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये संघटनेचे सुमारे दहा लाख रुपये आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बँकेतील बचत खाते आणि मुदत ठेवीबद्दल मागील संतुलन पत्रिकेत माहिती देण्यात आली. मात्र, परिषदेच्या अधिवेशनाची माहिती सदस्यांपासून लपवून ठेवण्यात आल्याचा आरोप काही सदस्यांचा आहे. यासंदर्भात मराठी विज्ञान परिषद, नागपूर विभागाचे माजी अध्यक्ष मधुसूदन मुडे म्हणाले, मी अध्यक्ष झाल्यावर पहिली बैठक माझ्या शाळेत बोलावली. या बैठकीत एक कार्यकारिणी सदस्य मला मारायला धावले. मी मुख्याध्यापक असलेल्या शाळेत असला प्रकार मी कसा काय खपवून घेणार आहे. त्यामुळे मी त्या सदस्याला बाहेर जाण्यास सांगितले. शिवाय बैठकीला दहा सदस्यांपैकी पाच सदस्य गैरहजर होते. प्रा. भड आणि काटेकर आले नव्हते. या दोघांच्या गटांनी मला अध्यक्षपदासाठी समर्थन दिले होते. या दोन्ही गटांनी प्रत्येक चार सदस्य नामनियुक्त सदस्य नियुक्त करण्याची मागणी केली. मला चार सदस्य नामनियुक्त करता येणार होते. शिवाय भडच्या गटाला उपाध्यक्ष आणि कोषाध्यक्षपद हवे होते. मला दोन्ही गटांना समान संधी द्यायची होती. दुसरी बैठक सायंकाळी ७ वाजता बोलावण्यात आली. उपाध्यक्ष कल्पना उपाध्याय यांचा सायंकाळच्या बैठकीला विरोध होता. शिवाय परिषदेच्या कार्यालयात मद्याच्या बाटल्या सापडल्या असल्याचे कस्तुरबा भवनच्या व्यवस्थापकीय मंडळाचा आरोप आहे. मी अध्यक्ष झाल्यापासून कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्यांना बैठकीला हजर राहण्यास वेळच मिळत नव्हता. या पाश्र्वभूमीवर मला काम करणे शक्य नव्हते. एक दिवस प्रा. भड माझ्याकडे आले आणि राजीनामा मागितला. मी क्षणाचाही विलंब न करता तो देऊन टाकला.

सचिवांनी चार-पाचदा बैठक बोलावली. परंतु अध्यक्ष मधुसूदन मुडे आले नाहीत. त्यामुळे केवळ ५० ते ६० टक्के उपक्रम राबवता आले. कोणताही मोठा कार्यक्रम करू शकलो नाही. प्रत्येक ठिकाणी अध्यक्षांची स्वाक्षरी आवश्यक असते. त्यामुळे प्रा. भड यांनी त्यांना सांगितले, बैठकीला येत नसला तर राजीनामा देऊन टाका. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मला कार्यकारी अध्यक्ष करण्यात आले. गेल्या वर्षभरपासून खर्च झाला नाही. त्याचा हिशेबही नाही. जुन्या अध्यक्षांची स्वाक्षरी बदलून नवीन अध्यक्षांची स्वाक्षरीला मान्यता मिळावी. यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू आहे. जानेवारीत ही प्रक्रिया होईल. त्याआधी सर्वसाधारण वार्षिक सभा घेण्याचा विचार आहे, असे मराठी विज्ञान परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष वासुदेव झेलबोंडे म्हणाले.

मुडेंनी अध्यक्ष झाल्यापासून एकही बैठक घेतली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून राजीनामा घेतला. लेखा परीक्षणाचे काम थांबले आहे. ते झाल्यावर सर्वसाधारण वार्षिक सभा घेण्यात येईल. कार्यक्रम घेण्यात आले पण त्याची प्रसिद्धी झाली नाही. अधिवेशनाच्या खात्यातील सर्व रक्कम खर्च झाली आहे. सरकारकडून ५० रुपये मिळणार होते. म्हणून ते खाते महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत सुरू आहे. नागपूर विभागाची नोंदणी वेगळी आहे. मुंबई सोबत केवळ संलग्नीकरण आहे. ते आपल्याला आदेश देऊ शकत नाही, असे मराठी विज्ञान परिषद, नागपूर विभागाचे सचिव प्रा. अशोक भड म्हणाले.