News Flash

जाहिरातीतला मराठी चेहरा

जाहिरात म्हणजे नॅनो चित्रपटच.. वीस सेकंदांचा.. भावनांचा खेळ.. कलाकारांच्या अभिनयाची कसोटी पाहणारा.. कदाचित म्हणूनच या खेळात आज कधी नव्हे इतके नवे मराठी चेहरे दिसू लागले

| June 2, 2013 12:16 pm

जाहिरात म्हणजे नॅनो चित्रपटच.. वीस सेकंदांचा.. भावनांचा खेळ.. कलाकारांच्या अभिनयाची कसोटी पाहणारा.. कदाचित म्हणूनच या खेळात आज कधी नव्हे इतके नवे मराठी चेहरे दिसू लागले आहेत. ते गोड गोजिरे, चिकनेचुपडे नसतील, पण प्रेक्षकांपर्यंत जाहिरातींचा संदेश नेटकाच पोहचवणारे मात्र नक्कीच असतात. जाहिरातींमधून आपल्या घराघरांत पोहोचलेल्या या मराठी कलाकारांची, त्यांच्या संघर्षांची, यशाची ही कहाणी.. आजपासून दर रविवारी..

जॉनसन्स बेबी सोपच्या जाहिरातीमधील आई पाहिल्यावर पटकन लक्षात आलं अरे ही तर मीता सावरकर. जाहिरात क्षेत्रात मीताच्या नावावर आजतागायत तब्बल २०० पेक्षा जास्त जाहिराती आहेत. कोलगेट, माझा, बजाज पल्सर, जॉनसन्स बेबी शॅम्पो यांसारख्या अनेक मोठय़ा ‘ब्रॅन्डस्’ने त्यांच्या उत्पादनांचे प्रमोशन करण्यासाठी मीताच्या चेहऱ्याला पसंती दिली. एके काळी ऑडिशनला गेल्यावर तुझ्या एकावर एक असलेल्या दाताचं काहीतरी कर, असं तिला सांगण्यात येत असे. त्याच मीताने नंतर कोलगेटच्या जाहिरातीमध्येही चमकून दाखवलं. मीताची ही अ‍ॅड जर्नी जाणून घेऊ या तिच्याच शब्दांत.
मनोरंजन क्षेत्रातील माझा प्रवास मराठी मालिकांपासून सुरू झाला. दहा वर्षांपूर्वी दोन मालिकांमध्ये माझं काम सुरू होतं. पण घरच्यांनी मला अगदी स्पष्ट बजावलं होतं, की केवळ छंद म्हणून या क्षेत्राकडे बघ. त्यामुळे आता काय करायचं, असा प्रश्न माझ्यासमोर उभा होता. म्हणूनच दुसरी मालिका सुरू असतानाच जाहिरात क्षेत्राकडे वळण्याचे ठरवलं आणि त्या क्षेत्रात जाण्यासाठी काय करायला हवं याचा विचार केला.
माझं असं वैयक्तिक मत आहे की, एखादं क्षेत्र कसं आहे हे प्रत्यक्षात तेथे काम केल्याशिवाय कळत नाही. जाहिरात क्षेत्र हे क्रिएटिव्ह फिल्ड आहे. मी स्वत:हून माहिती मिळविण्यास सुरुवात केली. एक पोर्टफोलिओही बनवला. त्या वेळी त्याची किंमत होती निव्वळ १५ हजार. मॉडेल कोऑर्डिनेटर्सचे नंबर्स मिळवणं प्रत्येक एजन्सीत जाऊन आपला पोर्टफोलिओ देणं असं करत राहिले. त्या वेळी फेमस स्टुडिओमध्ये अनेक एजन्सीज् होत्या. एका ठिकाणी गेल्यावर किमान चार एजन्सीमध्ये आपले फोटो जात होते. मी काम मिळेल या आशेने माझे फोटो प्रत्येक ठिकाणी देत गेले. प्रयत्न केल्याशिवाय काम मिळणार नाही हे मला ठाऊक होतं. त्यानंतर मला ऑडिशन्ससाठी फोन यायला सुरुवात झाली.
जाहिरात क्षेत्रात स्वत:ला अजमाविण्याचा निर्णय मी घेतला आणि वेळ न दवडता मी थेट गौतम राजाध्यक्ष यांना भेटले. तो क्षण माझ्यासाठी टर्निग पॉइंट होता. त्यांनी मला सांगितले, या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर स्वत:ला ग्रुम कर. तीन महिन्यांनी येऊन भेट, म्हणजे आपण शूट करू या.
स्टिल फोटोग्राफीमध्ये मी बरंच काम केलं आहे. एका वर्तमानपत्राच्या लाँचिंगसाठी काम केलं होतं. ती जाहिरात संपूर्ण मुंबईभर झळकली. मोठमोठे होर्डिग्ज लागले होते. त्या जाहिरातीमधून मी खऱ्या अर्थाने क्लिक झाले. पहिली माझी जाहिरात ‘माझा’ या कोल्डड्रिंकची होती. ती जाहिरात थिएटर्समध्ये झळकली. माझ्या बाबतीत अगदी स्पष्ट सांगायचं तर मी सामान्य स्त्री, आई, तरुण मुलगी, ग्लॅमरस लूक अशा सर्व भूमिकांमध्ये अगदी फिट बसते. त्यामुळे मला विविध उत्पादनांच्या जाहिराती करायला मिळाल्या. अगदी सुरुवातीच्या काळात बजाज पल्सरची माझी जाहिरात खूप गाजली. त्यानंतर मला आमच्या विभागात ‘पल्सर’ म्हणून चिडवायला सुरुवात झाली होती.
जॉनसन्स बेबीच्या जाहिराती तर अगदी वर्ल्डवाइड हिट झाल्या. चांगल्या अनुभवांच्या बरोबरीने अनेक कडू आठवणीही आहेत. एकदा कॅडबरीच्या जाहिरातीसाठी माझी निवड झाली होती. शूटच्या काही तास आधी मला फोन आला आणि सांगण्यात आलं की, दुसऱ्या मॉडेलची निवड झाली आहे. त्या वेळी खूप वाईट वाटलं. ‘राणीपाल’ या उत्पादनाची जाहिरातीची एक छोटी गोष्ट आहे. आधी माझी निवड करण्यात आली होती. नंतर दुसऱ्या मॉडेलची निवड करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. ठीक आहे, एवढंच बोलून मी तो विषय मनातून काढून टाकला. पण शूट सुरू होण्यापूर्वी एक तास आधी मला फोन आला आणि मला सांगण्यात आलं, ‘आम्हाला तूच मॉडेल म्हणून हवी आहेस.’ त्या वेळी मी दुसऱ्या एजन्सीमध्ये पोर्टफोलिओ देण्यासाठी जात होते. माझी कामं आटोपून येते, असे सांगून मी फोन ठेवला. ‘राणीपाल’ची जाहिरात शूट झाली आणि या जाहिरातीला बक्षीसही मिळालं.
सुरुवातीला अनेकदा ऑडिशनला गेल्यावर माझ्या एकावर एक असलेल्या दातामुळे मला काम नाकारले जाई. दात एकावर एक असल्यामुळे दिसतेस छान, पण याचं काहीतरी करायला हवं हे मला अनेकदा ऐकावं लागलेलं होते. त्यामुळे त्या दाताची मी कॉस्मेटिक डेंटिस्ट्री करून घेतली होती. त्यानंतर कोलगेटची दोन कॅम्पेन्स मला मिळाली. आयसीआयसीआयच्या एका जाहिरातीमध्ये मी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केलं होतं. तेव्हा मी खूप नवीन होते. पण आज मात्र एखाद्या मोठय़ा स्टारबरोबर काम करण्याची वेळ आली तर मात्र मी स्क्रिप्ट काय आहे हे नक्की बघेन. जाहिरात क्षेत्रात मला आनंद मिळाला.

मीताचा सल्ला
जाहिरात क्षेत्रात काम करायचं असेल तर तुम्हाला स्वत:वर मेहनत घ्यायला हवी. तुमचे केस, चेहऱ्याची निगा राखायला हवी. या क्षेत्रात सर्वाधिक स्पर्धा आहे. तुम्ही स्वत:ला वेल ग्रुम ठेवायला हवं. काम मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करायला हवेत. जाहिरातीच्या क्षेत्रात केवळ तरुण चेहऱ्यांसाठी स्पर्धा नसते. तर इथे वयस्कर व्यक्तींनाही प्रचंड मागणी आहे. या क्षेत्रातील स्पर्धा हा एक वेगळाच विषय आहे.

मीताने केलेल्या जाहिराती
माझा, डेटॉल, लाइफबॉय, मॅगी, एलआयसी, बजाज पल्सर, सर्फ एक्सेल, गुड डे, मारी गोल्ड, किंडरजॉय चॉकलेट, सनफिस्ट कुकीज्, ओडोमास नॅचरल्स, टाटा सॉल्ट, मूव्ह, हॅलो बासमती राइस, ब्रु कॉफी, जॉनसन्स बेबी शॅम्पो

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2013 12:16 pm

Web Title: marathi face of advertising world
Next Stories
1 इंडस्ट्रीच्या बदलत्या प्रवाहाशी जुळवून घेणारेच इथे टिकतील! – रिचा चढ्ढा
2 फक्त गाणी, बाकी सबकुछ रणबीर
3 ‘लोच्या झाला रे..’
Just Now!
X