रसिक श्रोत्यांकडून कधी हशा आणि टाळ्या वसूल करत तर कधी त्यांना अंतर्मुख करत महाराष्ट्राच्या विविध भागांतील श्रेष्ठ कवींनी मराठी भाषेतील कसदार व बळकटपणा दाखवून देत, इंग्रजीचे कितीही आक्रमण झाले तरी, मराठी भाषा कधीही लोप पावू शकणार नाही, याची जाणीव करून दिली.
निमित्त होते जागतिक मराठीदिनाचे, कवी कुसुमाग्रजदिनाचे. हे निमित्त साधत नगर आकाशवाणी केंद्राने काल सायंकाळी‘आशयघन’हे राज्यस्तरीय कविसंमेलन नगरमधील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात आयोजित केले होते. वात्राटिकाकार रामदास फुटाणे यांच्यासह कवी नारायण सुमंत, महेश केळुस्कर, संगीता बर्वे, सुनील शिनखाडे, प्रकाश घोडके आदी कविसंमेलनात सहभागी झाले होते.
नारायण सुमंत यांच्या‘आम्ही रं गडय़ा आम्डनावाचे शेतकरी’ व ‘धरण’ या कवितांना श्रोत्यांनी हशा व टाळ्यांची प्रचंड दाद मिळवली. ‘हा हाताला लकवा आहे की घडय़ाळाचा थकवा आहे, काहीही असो जनतेला मात्र चकवा आहे’ या व अशा वात्रटिकांनी रामदास फुटाणे यांनी रसिकांना खूश आणि तृप्त करून टाकलं. ‘आता कसं वाटतंय’ ही दासू वैद्य यांची कविता अंतर्मुख करायला लावणारी होती. स्त्रियांच्या जगण्यातल्या जाणिवांचं दर्शन घडवणारी ‘ती’ ही संगीता बर्वे यांची कविताही भावली. ‘माझा मुलगा’ ही सुनील शिनखेडे यांची कविता, तर ‘हळू हळू दिवस कठीण येतील, पुढे पुढे बैलांनाही राग येईल, साहित्यिक म्हणाल्यावर आणि सामान्यांनाही बंदी असेल पेडर रोडवरून चालायला पुढे पुढे’ही महेश केळुस्करांची कविताही उपस्थितांना आवडली. दरवेळेप्रमाणे प्रकाश घोडके यांच्या‘तिच्या दारावरून जाताना’ या कवितेस यंदाही रसिकांनी दाद दिली.
आकाशवाणीचे कार्यक्रम विभागप्रमुख प्रदीप हलसगीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. दीपाली जोशी व वृषाली पोंदे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाचे प्रसारण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून २६ फेब्रुवारीला रात्री १० ते ११ या वेळेत केले जाणार आहे.