इंग्रजाळलेली मराठी बोलणारे, अत्यंत टेचात त्याचा अभिमान बाळगणारे किंवा होता होईल तितके मराठी बोलणे टाळणाऱ्यांची संख्या वाढत असताना, नागपुरातील अनेक अमराठी कुटुंबांनी जाणीवपूर्वक मराठीची जोपासना केली आहे. प्रथमदर्शनी मराठीच वाटावे इतक्या बेमालूमपणे त्यांनी मराठी भाषाच नव्हे, तर मराठी संस्कृतीही आत्मसात करून इतरांसमोर उदाहरण ठेवले आहे.
ख्यातनाम नाटय़कलावंत गणेश नायडू यांनी आपली मायभाषा तेलगू आणि मातृभाषा मराठी असल्याचे सांगितले. मराठी नाटकांच्या निमित्ताने मी मराठी बोलावयास शिकलो आणि निर्दोष नसले तरी माझे ९५ टक्के मराठी व्याकरण चांगले आहे. नाटकातही संवाद योग्य मराठीत बोलले जावे व रोजच्या वापरातही शुध्द व अचूक मराठीच बोलली जावी, यावर माझा कटाक्ष असतो. मराठीतील अनेक नामवंत लेखक मी वाचले आहेत, तसेच नागपुरातील वरखेडकर किंवा माडखोलकर यांनाही वाचले-ऐकले आहे. त्यातून माझी मराठी घडत गेली. माझ्या घरात माझे आईवडील व मोठय़ा बहिणी वगळता आम्हाला कुणालाच तेलुगू येत नाही किंवा ती शिकण्याचा प्रयत्नही केला नाही, असे नायडू म्हणाले.
नागपुरात समाजजीवनात प्रत्येकाला माहिती असणारे वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांना कार्यक्रमांमधून उत्कृष्ट मराठी बोलताना अनेकांनी बघितले आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकले-बोलले पाहिजे, हे जाहीरपणे ते अनेकदा सांगत असतात. त्यांच्या मते मारवाडी कुटुंबातील जन्म वगळता ते संपूर्णपणे मराठीच आहे. ‘माझी विचार करण्याची भाषा मराठी आहे, संस्कार मराठी आहे, मित्र मराठी आहेत, इतकेच काय माझे आवडीचे पदार्थही मराठी आहेत. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक हिंदी भाषकाने, व्यवसाय करणाऱ्याने मराठीत बोललेच पाहिजे. मराठी शिकलो तरच येथील वातावरण समजून घेऊन त्याच्याशी एकरूप होऊ शकतो,’ असे गांधी म्हणाले.
ग्रामीण भागातून येऊन नागपूर-विदर्भाच्या नाटय़क्षेत्रात नाव कमावणारे सलीम शेख हेही असेच मराठीशी एकरूप झालेले व्यक्तिमत्व आहे. संपूर्ण शिक्षण मराठीतून झालेले शेख यांनी अपवाद वगळता आजवरची सगळी नाटके मराठीत लिहिली आहेत व ती वाखाणली गेली आहेत. ‘माझ्या ज्येष्ठ बंधूंमुळे आम्हा भावंडांवर मराठीचे संस्कार झाले. मी माझ्या मित्रांशी लहानपणापासून मराठीतच बोलायचो. महाविद्यालयात असताना मी पहिली कविता लिहिली तिही मराठीतच. जितक्या सहजपणे मी मराठीत नाटके लिहू शकतो तितकी माझी हिंदी किंवा उर्दूवर पकड नाही. तेथे मला चाचपडत लिहावे लागते. माझी पत्नी मराठी आहे आणि आमची मुलगी घरात मराठी व हिंदी दोन्ही भाषेत बोलते,’ असे शेख यांनी सांगितले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी हिंदीभाषक असणारे खासदार अविनाश पांडे यांनी नुकतीच राज्यसभेत केली होती. मराठीच्या न्यूनगंडाबाबत विद्वतचर्चा घडत असताना नायडू, गांधी किंवा शेख यांच्यासारख्या अनेक अमराठी व्यक्तींनी ही भाषा भविष्यातही ‘अमृतातेही पैजा’ जिंकणारी राहणार असल्याचे सिध्द केले आहे.