कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस अर्थात मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत राजकीय पक्ष, संस्थांकडून परिसंवाद, व्याख्यान, ग्रंथदिंडी, काव्यवाचनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, मनसे मराठीचा मुद्दा वारंवार उपस्थित करीत असल्याने भाजपसह इतर राजकीय पक्षांनी या दिनाचे औचित्य साधत खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी सकाळी सहा वाजता कुसुमाग्रज स्मारकात ‘कुसुमाग्रज पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रमाकांत गायकवाड यांचे गायन आणि प्रसाद रहाणे यांचे सतारवादन होईल. दुपारी १२ वाजता वि. वा. शिरवाडकर लिखित नटसम्राट या नाटकाचा मुहूर्त होणार असून अभिनेते नाना पाटेकर आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर या वेळी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ४ वाजता महाकवी कालिदास कला मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांना जनस्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रतिष्ठानने २७ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत ‘कुसुमाग्रज स्मरण’ कार्यक्रमाचे आयोजन कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे केले आहे. शनिवारी शहरातील १३० विद्यार्थी समूह तबला वादन करणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत ऊर्मिला पवार लिखित आयदान आणि कुसुमाग्रजांच्या कथेवर आधारित ‘रिमझिम रिमझिम’ नाटकाचे सादरीकरण, दत्ता पाटील लिखित प्रथम पुरुषी एकांक, अनिल कुसूरकर लिखित ‘त्यांच्या दैनंदिनानिमित्त अधलीमधली पाने’ यांचे अभिवाचन, नाशिकमधील दिवंगत कवींच्या कवितांचे गीतांच्या स्वरूपात सादरीकरण, डॉ. तनुजा नाफडे यांचे शास्त्रीय, उपशास्त्रीय गायन, काव्य संमेलन होईल. ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमांतर्गत वाचक मेळावा, कुसुमाग्रज अभ्यासवृत्ती प्राप्त अवधूत डोंगरे यांची त्यांनी अभ्यासवृत्ती स्वीकारून लिहिलेल्या कादंबरीबद्दल प्रकट मुलाखत, ‘प्रकाशाची शब्दफुले’ अंतर्गत कुसुमाग्रज आणि जनस्थान पुरस्कार प्राप्त कवींचे काव्य वाचन होईल. मकरंद हिंगणे आणि किशोर पाठक हा कार्यक्रम सादर करतील.
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता नाटय़ परिषदेच्या सभागृहात ‘रंग कवितेतील नाटय़ाचे’ कार्यक्रम होणार आहे. या वेळी कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांचे अनोख्या पद्धतीने सादरीकरण करत त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात येणार आहे. कुसुमाग्रजांच्या कवितांमधील नाटय़ रसांचा शोध घेत कविता आविष्कृत केली जाईल. त्यात अभिनेत्री विद्या करंजीकर, अर्पणा क्षेमकल्याणी, युवा रंगकर्मी श्रीपाद देशपांडे, प्राजक्त देशमुख, दीप्ती चंद्रात्रे, बालकलाकार सई मोराणकर यांच्यासह स्थानिक कलावंत सहभागी होणार आहेत. भाजपच्या सांस्कृतिक मंच नाशिक महानगरच्या वतीने शुक्रवारी सकाळी ११ वाजता पक्ष कार्यालयात डॉ. प्रा. वृंदा भार्गवे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच मनसेतर्फे कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. तसेच दुपारी महात्मा फुले कलादालन परिसरातून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. ही ग्रंथदिंडी शालिमारमार्गे संत गाडगे महाराज पुतळा, मेन रोड मार्गे रविवार कारंजा परिसरात येईल. तसेच, मनसेच्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागात निबंध तसेच काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन केले आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून मनसे मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. मराठीच्या मुद्दय़ावर मनसेने दिलेला भर लक्षात घेऊन त्यांना शह देण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे. भाजपतर्फे या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम त्याचे निदर्शक म्हणता येईल. एरवी भाजपकडून मराठी भाषा दिन या पद्धतीने साजरा झाला नसल्याची भावना पक्षाच्या वर्तुळात उमटत आहे.