विरारच्या यंगस्टार ट्रस्ट तर्फे मराठी दिनानिमित्त ‘चला बोलूया शुद्ध मराठीत’ या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विरार आणि नालासोपारा येथे एकाच वेळी दोन ठिकाणी या स्पर्धा घेण्यात आल्या शालेय विद्यार्थी आणि खुल्या अशा दोन गटात ही स्पर्धा झाली. स्पर्धक विद्यार्थ्यांनी चिठ्ठी उचलून असलेल्या विषयावर दोन मिनिटे मराठीत बोलायचे होते. दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक आणि रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. दैनंदिन जीवनात मराठी भाषेत इंग्रजीचा वापर अधिक वाढला असून मराठी भाषेचे जतन करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे आयोजक अजिव पाटील यांनी सांगितले.
इंग्रजी शाळेत मराठी भाषा दिन
इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना मराठीचे महत्त्व कळावे या साठी चेंबूरच्या नारायण गुरू हायस्कूल मध्ये मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. प्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर यावेळी उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना मराठी भाषेचे महत्त्व, तिचे व्यवहारातले उपयोग सांगून मराठी शब्दसंपत्ती समृद्ध करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी महाराष्ट्रातल्या मराठी सणांच्या विविध प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या. मराठी आणि अमराठी विद्यार्थ्यांनी पसायदान, काव्यवाचन आणि छोट्या नाटिका सादर केल्या. या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी सलीम कुमार, पी के वेणू आदी उपस्थित होते.
महानगर टोलिफोन निगमतर्फे ‘हास्यधारी’
महानगर टेलिफोन निगम स्थानीय लोकाधिकार समिती आणि कामगार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने माटुंग्याच्या यशवंत नाटय़गृहात मराठी भाषादिन साजरा करण्यात आला. मराठी भाषेची शैली आणि क्षमता दर्शविणाऱ्या ‘हास्यधारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कवी रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, फ मु शिंदे साहेबराव ठणगे आदीनी त्यात भाग घेतला. महानगर टेलिफोन निगमच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचे महत्त्व सांगितले