19 September 2020

News Flash

विविध कार्यक्रमांव्दारे मराठी भाषा दिन साजरा

काव्यवाचन, दिंडी, कथाकथन, परिसंवाद, नाटिका, व्याख्यानमाला तसेच प्रश्नमंजुषा आदी विविध कार्यक्रमांव्दारे शहरासह जिल्ह्यातील विविध संस्था

| March 3, 2015 06:50 am

काव्यवाचन, दिंडी, कथाकथन, परिसंवाद, नाटिका, व्याख्यानमाला तसेच प्रश्नमंजुषा आदी विविध कार्यक्रमांव्दारे शहरासह जिल्ह्यातील विविध संस्था, संघटना आणि शाळा, महाविद्यालयांनी मराठी भाषा दिन साजरा केला.
जयरामभाई हायस्कुलमध्ये काव्यवाचन
नाशिक येथील जयरामभाई हायस्कुलमध्ये संवर्धन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने मराठी भाषा दिनानिमित्त काव्यवाचन स्पर्धा झाली. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मराठी माध्यमाच्या शाळा हा पुरोगामी महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व वैचारिक प्रगतीचा कणा असल्याचे प्रतिपादन यावेळी प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले. यावेळी संवर्धन संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची मोठी परंपरा लाभली असून स्पर्धेच्या युगात मराठी भाषेचे अस्त्तिव टिकून राहण्यासाठी तसेच तिच्या संवर्धन व प्रसारासाठी तरूणांनी पुढे येणे आवश्यक असल्याचे नमूद केले. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. परीक्षक म्हणून एस. एच देशपांडे, एस. एस. चंद्रात्रे यांनी काम पाहिले. जे. एल.उगले यांनी सूत्रसंचालन केले. ए. बी. लोखंडे यांनी आभार मानले.
सीडीओ मेरी शाळा
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सीडीओ मेरी हायस्कुलमध्ये मराठी भाषा दिन तथा कविवर्य कुसुमाग्रज यांचा जयंती कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी शाळा समिती अध्यक्ष चंद्रशेखर वाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त मंडळ सदस्य अरविंद ओढेकर, मुख्याध्यापक आनंदा वाणी, शाळा प्रतिनिधी दिलीप अहिरे आदी उपस्थित होते. अनुष्का शिरोरे हिने ‘उघडा ताटी ज्ञानेश्वरा’ हे कथाकथन सादर केले. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या. भारती भोये यांनी सूत्रसंचालन केले. दीपाली पाटील यांनी आभार मानले.
देवळा महाविद्यालयात परिसंवाद
देवळा येथील महाविद्यालयात मराठी भाषा दिनानिमित्त ‘मराठीची योग्यता, मराठी परंपरा, मराठीचे भवितव्य’ या विषयावर परिसंवाद झाला. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य हितेंद्र आहेर होते. मराठी भाषा आणि संस्कृती हा केवळ आचरण उपचार नसून मराठी माणसांची वैश्विक ओळख आहे, असे ते म्हणाले. परिसंवादात अंकुश सोनवणे, संदेश निकम, बच्छाव, सुयश देवरे आदींचा सहभाग होता.
उन्नती विद्यालय
पेठरोड येथील उन्नती माध्यमिक विद्यालयात कवी शरद पुराणिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोक सोनजे होते. पुराणिक यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांमधून व्यक्तींच्या जीवनात अमूलाग्र बदल घडून येत असतात, असे नमूद केले. कुसुमाग्रजांच्या कविता म्हणजे जीवनातील मूल्य संघर्ष, ध्येयमार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी पुराणिक लिखीत ‘सत्यमेव जयते’ या नाटिकेचे सादरीकरण केले. संदीप सोनजे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक सुभाष पिंगळे यांनी प्रास्ताविक केले. सोमनाथ नेरकर यांनी आभार मानले.
फार्मसी महाविद्यालयात ज्ञानेश्वरीवर विवेचन
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या फार्मसी महाविद्यालयात मराठी भाषा दिनानिमित्त सुशील कोले या विद्यार्थ्यांने ‘मराठीतील एक अमूल्य ग्रंथ ज्ञानेश्वरी’ या विषयावर विवेचन केले. प्राचार्य डॉ. दिलीप डेर्ले यांनी शिरवाडकर यांच्या समग्र साहित्याचे तसेच भावस्पर्शी कवितांविषयी माहिती दिली. औषध निर्माणशास्त्रच्या विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात मराठी भाषेचे योगदान याविषयी मार्गदर्शन केले.
सुभाष वाचनालय
जुने नाशिक परिसरातील सुभाष सार्वजनिक वाचनालयात मराठी दिन आणि कवी कुसुमाग्रज जयंती समारंभ नुकताच झाला. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते विलास क्षेमकल्याणी उपस्थित होते. वाचनालयाचे उपकार्याध्यक्ष प्रभाकर खंदारे अध्यक्षस्थानी होते. प्रास्ताविक दत्ता पगार यांनी केले. अभिप्रायासाठी आलेल्या पुस्तकांसह त्यांची काही पुस्तके कुसुमाग्रजांनी वाचनालयास भेट म्हणून दिली होती. त्याचा उल्लेख करण्यात आला. विश्वस्त रामदास सोनवणे यांनी आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 6:50 am

Web Title: marathi language day celebrated by various programmes
टॅग Nashik
Next Stories
1 ‘श्यामची आई’ पुस्तकाचे विद्यार्थिनींना मोफत वाटप
2 स्थायी समितीवर ८ सदस्यांची निवड
3 परिसंवाद, दिंडी, मैफल याद्वारे मराठीचा जागर
Just Now!
X