महाराष्ट्र राज्य सर्वसमावेशक आहे आणि मराठी माणूस सहिष्णू आहे. परंतु, त्याला सार्वजनिक ठिकाणी मराठी बोलण्याची शरम वाटते, असे परखड मत ज्येष्ठ लेखक-पत्रकार अरूण साधू यांनी व्यक्त केले.
 मुंबई महानगरपालिकेतर्फे मराठी भाषा दिनापासून मराठी भाषा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. महापौर सुनील प्रभु कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तर आयुक्त सीताराम कुंटे, उपमहापौर मोहन मिठबावकर उपस्थित होते.
संगणकावर मराठी भाषा लिहिण्यात अनेक अडचणी येतात. कारण देवनागरी लिपी विकसित करण्यात आलेली नाही. मराठी भाषेचे जागतिकीकरण करण्यासाठी देवनागरी लिपी विकसित करणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करायला हवेत, असेही साधू म्हणाले. मराठी भाषा पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन असूनही मराठीचा मुद्दा घेऊन निवडून आलेले मनसेचे नगरसेवक मात्र अनुपस्थित होते. तसेच गटनेते दिलीप लांडेही गैरहजर होते.
माहिती तंत्रज्ञान संचालनालयाला ई व्यवस्थापनासाठी उपयुक्त असे मराठी सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यास सांगितले असून लवकरच पालिकेची सर्व परिपत्रके मराठी भाषेत देण्यात येतील अशी माहिती आयुक्त सीताराम कुंटे यांनी या वेळी दिली.