‘कामगार साहित्य: दहा भाषणे’ हे पुस्तक महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने २००१ मध्ये प्रकाशित झाले. नारायण सुर्वे यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात कामगार साहित्य संमेलनाच्या दहा अध्यक्षांची भाषणे आहेत. सर्वश्री नारायण सुर्वे, बाबुराव बागूल, आनंद यादव, सदा काहाडे, अरुण साधू, उत्तम बंडू तुपे, शिवाजी सावंत, नामदेव ढसाळ, विठ्ठल वाघ, मधू मंगेश कर्णिक यांची अध्यक्षीय भाषणे असलेल्या या पुस्तकाची अर्पणपत्रिका अशी आहे.
‘संस्कृतीचा कणा असलेल्या समग्र कष्टकरी वर्गास-‘
समग्र कष्टकरी वर्गास संस्कृतीचा कणा समजणाऱ्या सर्व चळवळींमधील कार्यकर्त्यांसाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे. प्रास्ताविकात नारायण सुर्वे लिहितात, ‘.. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात ज्या दबलेल्या सामाजिक शक्ती अथवा सामाजिक थर होते ते सर्व स्वातंत्र्य मिळताच स्वअस्मितेचा शोध घेत उफाळून वर आले. त्या शक्ती स्वअस्तित्व जाणवीत ज्वालामुखीसारख्या उफाळल्या. हे असे होणे स्वाभाविकही होते. स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचे दरवाजे अधिक रुंद होताच किंवा शाळा, कॉलेज खेडोपाडी निघताच ते शिकू, वाचू, लिहू लागले आणि नंतर त्या कष्टकरी वर्गानाही आत्मभान येताच विद्यमान साहित्यात आपण कोठे आहोत, याचा शोध सुरू  झाला. आधीच्या सर्व सामाजिक बदल मागणाऱ्या थोरामोठय़ांनी चळवळी उभ्या केल्या होत्याच आणि त्यालाच पूरक म्हणून शिक्षणाचा एक तिसरा नेत्र या आपल्या कष्टकरी वर्गातील मंडळींना लाभताच त्यांच्यातील सृजनशक्तीचा, निर्मितीचा उत्साह वाढला. कामगार साहित्याचा उगमही याच आत्मभानातून झालेला आहे. याच भानातून इतरही वेगवेगळ्या समाजथरांतून ज्या वाङ्मयीन चळवळी उभ्या राहिल्या त्यांचाही उगम असाच झालेला आहे. तसे मराठी किंवा आधुनिक भारतीय साहित्याचे वय दीडशे वर्षांचे असावे. कामगार हा ‘वर्ग’ म्हणून जो उदयीमान झाला त्याचे सर्वसाधारणपणे तितकेच वय आहे, मात्र कामगार साहित्य किंवा साहित्यिक चळवळ म्हणून आता ते दहा वर्षांचेच आहे आणि म्हणूनच या दहाव्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘कामगार साहित्य: दहा भाषणे’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्याची कल्पना पुढे आली. खरे तर, हा एक शोध घेण्याचाही प्रयत्न आहे. स्वत:चेही आत्मपरीक्षण करावे असाही आहे.’ (पृष्ठ आठ) नारायण सुर्वे यांच्या या विवेचनातून या पुस्तकाच्या संपादनामागील हेतू तर स्पष्ट होतोच, पण एकूणच कामगार चळवळी, त्यांचे साहित्य, या साहित्याचे प्रयोजन त्या साहित्याच्या प्रभावाची आणि परिणामांची चिकित्सा या साऱ्या बाबींचे मूल्यमापन झाले पाहिजे, अशी भूमिकाही दिसते. अध्यक्षीय भाषणांमधून कामगार चळवळी, त्यांचे साहित्य याविषयीची काही एक चिकित्सा निश्चितच झाली आहे. विविध चळवळींसह कामगार चळवळीत सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांना, नव्या लेखकांना ही चिकित्सक भाषणे उपयुक्त ठरणारी आहेत.
पहिल्या कामगार साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणात नारायण सुर्वे म्हणाले होते. ”.. आमच्याही सर्वच लेखनाला वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रकाशातच वाटचाल करावी लागेल. आपला लेखक मुळात अंतर्बाह्य़ बदलला पाहिजे. तो बाहेरून कामगार आणि परिवर्तनवादी व आतून मात्र परंपरावादी ही भूमिका टाकून द्यावी लागेल. त्याला जात, रुढी, कर्मकांडे, प्रारब्ध व ईश्वर आणि शोषण करणाऱ्या सर्व व्यवस्थांविरुद्ध व जुनाट सडलेल्या विचारांविरुद्ध भक्कमपणे उभे राहावे लागेल’ (पृष्ठ ०९) कामगार साहित्यिकाविषयीची ही भूमिका फार महत्त्वाची आहे. कामगार साहित्यिक हा विज्ञानवादी आणि लोकशाहीवादी असला पाहिजे, त्याने परिवर्तनाची मानवतावादाची नितांत सुंदर संस्कृती निर्माण करण्यासाठी वाणी आणि लेखणीने प्रयत्न केले पाहिजेत. कामगार साहित्यिकांना उद्देशून पुढे नारायण सुर्वे म्हणतात, ‘आपण केवळ कामगारवर्गीय लेखकच नाही, तर समग्र मानवजातीच्या सुखदु:खांशी बांधील व तिच्या गतिशील आणि संघर्षमय जीवनाचे यथार्थ चित्रण करणारे, जनतेकडून शिकत व जनतेला शिकवत विकसनशील भूमिका घेणारे तिचे अग्रदूत आहोत’. ही भूमिका खूप सकारात्मक, बाणेदार, लढाऊ आणि प्रामाणिक आहे, जबाबदार आहे.
बाबुराव बागूल आपल्या अध्यक्षीय भाषणात कामगार साहित्यिकांच्या जबाबदारीविषयी, त्यांनी करावयाच्या कर्तृत्वाविषयी म्हणतात, ‘तुम्ही कामगार वर्ग या दु:खा दैन्याचे, दास्याचे घर बनलेल्या देशाचे आशास्थान आहात. वर्णवर्चस्ववादी जातीव्यवस्थेमुळे आपल्या देशाचा इतिहास पराभवाचा इतिहास झालेला आहे. तो जातीद्वेष, धर्मद्वेष नष्ट करणे, जातीय उच्चाटन करणे जरुरीचे आहे आणि ते तुम्हीच करू शकतात, कारण जगभर त्या त्या देशातील कामगारांनी शोषणसत्ता नमवून घेतलेल्या आहेत. रशियन व चिनी जनतेने तर शासन सत्ताच हाती घेतल्या होत्या. म्हणून कामगार वर्गातील प्रतिभावंत, कलावंत मित्रांनो, आपण असे लेखन करू या की, एकलव्याला त्याचा अंगठा परत मिळेल. तो निपुण योद्धा आहेच, तो वर्ण, जाती, वर्ग या सर्वच व्यवस्था नाहीशा करून टाकील, याबद्दल खात्री बाळगा’ (पृष्ठ २२) एकलव्याला अंगठा परत मिळवून देण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न करणाऱ्या प्रतिभांची गरज कामगार साहित्यासह एकूणच सर्व परिवर्तनाच्या चळवळी व साहित्य प्रवाहांनाही आहे.
या पुस्तकातील दहाही अध्यक्षीय भाषणांमधून साहित्य, संस्कृती, चळवळी, परिवर्तनाची जीवनमूल्ये याविषयी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून, वेगवेगळ्या भूमिकांमधून नानाविध आयामांनी चर्चा, चिकित्सा, विश्लेषण मूल्यमापन केले गेले आहे. राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक चळवळींसह, साहित्य, संस्कृती, शासन, राजकारण याविषयीची निरीक्षणे, आकलने येथे व्यक्त झाली आहेत. ही निरीक्षणे आणि आकलने नव्या वाटा दाखविणारी आहेत म्हणून हे पुस्तक महत्त्वाचे व  संग्रहणीय आहे.

Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Shrikant Shinde
“कुवतीपेक्षा जास्त झेपत नसेल तर…”, खासदार श्रीकांत शिंदे यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
Letter to Vijay Shivtare
“माझा नेता पलटूराम निघाला, आता..”; विजय शिवतारेंना कार्यकर्त्यांनी लिहिलेलं खरमरीत पत्र व्हायरल