‘एक वेगळी दुनिया एक वेगळीच दुनियादारी’ असे म्हणत ‘दुनियादारी’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात खूप गाजला. उत्पन्नाच्या बाबतीतही या चित्रपटाने विक्रम केले. सुहास शिरवळकर यांच्या ‘दुनियादारी’ याच नावाच्या मूळ कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता. आता हा चित्रपट काही नवी दृश्ये आणि गाण्यासह पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे. रविवार २७ एप्रिल रोजी दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता झी टॉकीज या वाहिनीवरून ‘नवीन दुनियादारी’ प्रसारित होणार आहे.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो पुन्हा छोटय़ा पडद्यावर आणताना वेगळ्या स्वरूपात आणण्याचा हा प्रयत्न मराठी चित्रपटांच्या इतिहासात पहिल्यांदा होत असल्याचा दावा ‘झी टॉकीज’ने केला आहे. ‘नवीन दुनियादारी’ची कथा प्रेक्षकांना ‘श्रेयस’च्या नजरेतून पाहायला मिळणार आहे. श्रेयसच्या वाढदिवसाच्या निमित्त कट्टा गँगची सगळी मंडळी एकत्र आली असून त्या सर्वाना श्रेयस पाहत आहे. तो आता त्यांच्यात नसला तरी त्यांच्यातच आहे. ही आणि आणखी काही दृश्ये नव्याने चित्रित करण्यात आली असून ती चित्रपटात टाकण्यात आली आहेत. तसेच एका नवीन गाण्याचाही या ‘नवीन दुनियादारी’मध्ये समावेश करण्यात आला आहे.