‘प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं!?’ हा मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी चित्रपटातील प्रमुख कलाकार मृणाल, सचिन खेडेकर, सुनील बर्वे आणि पल्लवी जोशी यांनी एकत्र येत धम्माल गाणं गायलं आहे. या गाण्याच्या निमित्ताने लग्न, प्रेम याबद्दल या चौघांनाही ‘रविवार वृत्तांत’तर्फे काही प्रश्न विचारले. त्याची ही धम्माल उत्तरं..
१. पहिलं प्रेम किंवा क्रश कधी आणि कसं झालं?
मृणाल – माझ्या नवऱ्याने मी १५ वर्षांची असताना मला प्रपोझ केलं. त्या वयात प्रेम वगैरे फारसं काही माहीत नव्हतं. पण तो आवडायचा. पुढे काही वर्षांनी त्याच्याशीच लग्न झालं.
सुनील – कॉलेजमध्ये! कॉलेजशेजारच्या हॉटेलमध्ये ती तिच्या मैत्रिणींबरोबर बसली होती. आवडली म्हणून बरोबरच्या मैत्रिणींच्या मदतीने ओळख काढली. पुढे एकमेकांच्या प्रेमात पडलो. आज लग्नही झालंय त्याच मुलीबरोबर!
सचिन – पहिलं क्रश आठवत नाही. पण बहुतेक शाळेतच असावं. कदाचित सातवीत किंवा आठवीत असताना.
पल्लवी – क्रश म्हणशील, तर खूपच लहान असताना. मी चौथीत किंवा पाचवीत होते. त्या वेळी वर्गातला एक मुलगा खूप आवडायचा. पण प्रेम वगैरे या गोष्टी ऐकूनही माहीत नव्हत्या.
२. त्या वयातलं एखादं ‘ड्रिम साँग’ वगैरे.. आणि आता जोडीदारासाठी कोणतं गाणं मनात वाजतं?
मृणाल – हो तर! त्या वेळी ‘कयामत से कयामत तक’ नुकताच आला होता. त्यातलं ‘ए मेरे, हमसफर’ हे गाणं आपलंच आहे, असं वाटायचं. सुदैवाने आम्हाला काही घरून पळून वगैरे जावं लागलं नाही. आताचं म्हणशील, तर गाणं नाही. पण अनिल अवचट यांच्या एका पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेतील वाक्य त्याच्यासाठीच असावं, असं वाटतं. ते वाक्य आहे, ‘हे पुस्तक अर्पण करण्यासाठी का होईना, तुला माझ्यापासून लांब करावं लागलं, याचं दुख वाटतंय.’
सुनील – छे छे, ड्रिम साँग वगैरे माझ्याकडून काहीच नव्हतं. पण माझ्या बायकोला ‘बेताब दिल की तमन्ना यही’ हे गाणं त्या वेळी खूप आवडायचं. आता तिच्याकडे बघून एकच गाणं आठवतं, ‘हाँ तूम बिलकुल वैसी हो, जैसा मैने सोचा था’.
सचिन – त्या वेळी राजेश खन्नाचं ‘जीवन से भरी तेरी आँखे’ हे गाणं आपलं वाटायचं. आता पार्टनरसाठी ‘तेरी आँखो के सिवा दुनियांमें रख्खा क्या है’ हे गाणं मनात येतं.
पल्लवी – डायना रॉस आणि लिओनेल रिची यांच्या ‘एण्डलेस लव्ह’ या गाण्याने त्या वेळी जादू केली होती. आता मात्र नवऱ्यासाठी ‘तेरे लिए पलकोंकी झालर बुनूं’ हे गाणं आठवतं.
३. लग्नाला एक्स्पायरी डेट असावी का?
 या प्रश्नाला सगळ्यांनीच एकमुखाने ‘नाही’ असं उत्तर दिलं. मृणालच्या मते लग्नाला काही वॉरंटी किंवा गॅरेंटी नसते. मग एक्स्पायरी डेट तरी कशी असणार!
४. लग्नाआधी लग्नाबद्दल काय वाटायचं आणि लग्नानंतर काय वाटतंय?
मृणाल – लग्न झालं, त्या वेळी लग्नाबद्दल मत बनवण्याएवढीही मोठी झाले नव्हते. पण नंतर मात्र लग्न ही संकल्पना खूप आवडायला लागली. लग्न म्हणजे एकमेकांच्या साथीने बहरणं!
सुनील – लग्नाआधी वाटायचं, ‘लग्न पाहावं करून..’! पण लग्न झाल्यानंतर ‘का केलं लग्न’, असा विचार येतो. गंमत बाजूला ठेवू या. पण लग्न केल्याचा आनंद आणि समाधान आहे.
सचिन – लग्नाआधी वाटायचं की, लग्न संकट आहे. पण लग्नानंतर ते संकट नसून सहजीवन असल्याचं समजतंय.
पल्लवी – लग्नाबाबतच्या माझ्या ज्या संकल्पना होत्या, तस्साच नवरा आणि तस्संच घर मला लग्नानंतर मिळालं. लग्नानंतर मी अधिक मुक्तपणे जगायला शिकले. त्यामुळे माझ्यासाठी तेव्हाही आणि आत्ताही लग्न ही खूप गोंडस गोष्ट आहे.
५. लग्न आणि प्रेम यांचा एकमेकांशी किती संबंध आहे?
मृणाल – प्रेम हा या नात्याचा पाया आहे. लग्नानंतर या नात्यातलं प्रेम टिकावं म्हणून खूप प्रयत्न करावे लागतात. लग्न हे काही रक्ताचं नातं नाही. पण ते अनेक रक्ताची नाती तयार करतं. त्यामुळे प्रेम आणि लग्न यांचा संबंध खूप घनिष्ट आहे.
सुनील – प्रेम तुम्हाला वाट्टेल त्या व्यक्तीवर, वस्तूवर करावं. वाट्टेल तेवढं करावं. पण लग्न मात्र एकाशीच करावं!
सचिन – लग्न आणि प्रेमाचा घनिष्ट संबंध आहे. प्रेमाशिवाय लग्न टिकूच शकत नाही.
पल्लवी – लग्नाशिवाय प्रेम आणि प्रेमाशिवाय लग्न होऊच शकत नाही. या दोन्ही एकमेकांना पूरक गोष्टी आहेत.