गुढीपाडव्याच्या निमित्ताने निघणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रा म्हटले की, तरुणाईचा जल्लोष आणि ढोलताशांचा गजर आठवतो. नववर्षांच्या स्वागताच्या निमित्ताने वेगवेगळ्या शहरांतून निघणाऱ्या स्वागतयात्रांमध्ये तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतो. मात्र, इतक्याच ओसंडत्या उत्साहानिशी एक आजी-आजोबा गेल्या १३ वर्षांपासून अंबरनाथच्या स्वागतयात्रेत सहभागी होतात. यंदा वयाच्या ९९व्या वर्षीही अंबरनाथमधील रघुनाथ टाकळकर स्वागतयात्रेत सहभागी होणार आहेत, तर त्यांच्या पत्नी शशिकला या वयाच्या ९३व्या वर्षी रघुनाथ टाकळकर यांच्या खांद्याला खांदा भिडवून नववर्षांचे स्वागत करणार आहेत.
अंबरनाथमधील नववर्ष स्वागतयात्रेचे यंदा १३वे वर्ष आहे. या प्रत्येक वर्षी टाकळकर दाम्पत्य हिरिरीने स्वागतयात्रेत सहभागी झाले आहे. यंदाही स्वामी समर्थ चौकातून निघणाऱ्या यात्रेत हे जोडपे ढोलताशाच्या गजरावर थिरकताना दिसेल. वयाची नव्वदी ओलांडूनही या दोघांच्या मनातील उत्साह तरुणांना लाजवेल इतका आहे. शशिकला टाकळकर यांनी आजवर अनेकदा स्वागतयात्रेत विविध वेशभूषा करून सहभाग घेतला. तीन वर्षांपूर्वी त्यांनी मदर टेरेसांची वेशभूषा करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. लेझीम पथकातही त्यांचा सहभाग असतोच.
‘तेरा वर्षांपूर्वी जेव्हा अंबरनाथमध्ये नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे स्वागत यात्रेची सुरुवात झाली तेव्हा या समितीची पहिली अध्यक्षा मी होते. त्यामुळे या यात्रेत हिरिरीने सहभागी होणे हे माझे कर्तव्यच आहे,’ असे शशिकलाआजी म्हणाल्या.
तर आजोबा रघुनाथ टाकळकर म्हणतात- ‘गेली ७१ वर्षे मी अंबरनाथमध्ये राहतोय. अंबरनाथच्या सांस्कृतिक चळवळीचा वृक्ष बहरताना मी पाहिलेला आहे. त्यामुळे स्वागतयात्रेत जाणे हे माझ्यासाठी आवश्यक आहे.’
टाकळकर दाम्पत्याने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. या दोघांची दोन मुले, दोन मुली आणि नातवंडे, पतवंडे अंबरनाथमध्ये रहात नाहीत. मात्र, अंबरनाथच्या सांस्कृतिक वातावरणाने आपल्या मनाच्या कोपऱ्यात घर केले असल्याने येथून जाण्याचा विचार आम्ही स्वप्नातही करू शकणार नाही, असे हे दोघेही सांगतात.