डोळ्यात तेल घालून आणि प्राणांची बाजी लावून आपल्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी कारगिल येथे नुकतेच ‘मराठी तारका’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम तयार करण्यात आला असून मराठी मालिका, नाटक, चित्रपटातील आघाडीच्या अभिनेत्री ‘मराठी तारका’ कार्यक्रमात आहेत. नृत्य, संगीत व गाणी असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
सुमारे नऊ हजार फूट उंचीवरील कारगिल येथे झालेल्या ‘मराठी तारका’ कार्यक्रमात अभिनेत्री भार्गवी चिरमुले, श्वेता शिंदे, तेजा देवकर, प्राची पिसाट, नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे, राजेश बिडवे, सॅड्रिक डिसूझा, हितेश पाटील, बालकलाकार आदिती घोलप, विशाल जाधव आदी सहभागी झाले होते.
गायक विश्वजीत बोरवणकर यांनी काही देशभक्तीपर गाणी सादर केली. महेश टिळेकर यांनी सूत्रसंचालन व निवेदन केले.
याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या अभिनेत्रींनी सीमेवरील जवानांना राखी पौर्णिमेच्या निमित्ताने राखीही बांधली.
प्रत्यक्ष ताबारेषेवर तैनात असलेल्या मराठा बटालियनच्या जवानांसोबत मराठी तारकांनी ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या. ‘मराठी तारका’ हा कार्यक्रम याअगोदर राष्ट्रपती भवन येथे तसेच बारामुल्ला, सुनामीग्रस्त काही गावे येथेही सादर करण्यात आला आहे.