News Flash

‘बीअर कंपन्यांच्या हस्तकासारखा मराठवाडा जनता परिषदेचा वापर’

मराठवाडा जनता विकास परिषदेचे व्यासपीठ बीअर उद्योग कंपन्यांसाठी हस्तकासारखे काम करीत असल्याचा आक्षेप समन्यायी पाणीवाटपासाठी दाखल याचिकांच्या सुनावणीदरम्यान करण्यात आला.

| August 6, 2013 01:50 am

मराठवाडा जनता विकास परिषदेचे व्यासपीठ बीअर उद्योग कंपन्यांसाठी हस्तकासारखे काम करीत असल्याचा आक्षेप समन्यायी पाणीवाटपासाठी दाखल याचिकांच्या सुनावणीदरम्यान करण्यात आला. नांदूर मधमेश्वर संबंधित याचिकेच्या सुनावणीदरम्यान हस्तक्षेप अर्ज दाखल करणाऱ्या कारभारी मारुती आगवान यांच्या वतीने युक्तिवाद करताना केलेल्या या आक्षेपाची नोंद न्यायालयीन दप्तरी करण्यात आली.
जायकवाडी जलाशयात समन्यायी पाणीवाटपाच्या अनुषंगाने सुरू असणाऱ्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान आगवान यांनी शपथपत्राद्वारे मराठवाडा जनता विकास परिषद बीअर उद्योगाला पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगाने अवाक्षर काढत नाही. त्यांचे मौन बीअर कंपन्यांशी असणाऱ्या हितसंबंधाबाबत पुरेसे बोलके असल्याचा आरोपही करण्यात आला. दरम्यान, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दिवंगत गोविंदभाई श्रॉफ यांच्या वैचारिक मुशीतून निर्माण झालेल्या मराठवाडा जनता विकास परिषदेवर झालेले हे आरोप अश्लाघ्य असल्याची भावना निर्माण झाली असून मराठवाडय़ात संताप व्यक्त होत आहे.
समन्यायी पाणीवाटपाच्या अनुषंगाने मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे दाखल याचिकेवर कारभारी आगवान यांनी आक्षेप अर्ज दाखल केला होता. या अर्जाच्या अनुषंगाने न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे, की पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली जायकवाडीत पाणी आणून ते बीअर इंडस्ट्रीला वापरले जाते. मोठय़ा प्रमाणात दारूनिर्मिती होते. औद्योगिक विकास महामंडळामार्फत ३३ टक्के पाणीकपात केल्याचा आदेश कागदावरच राहिला. मार्चमध्ये ब्रह्मगव्हाण येथील पंपहाऊसमधून पूर्वीपेक्षाही अधिक पाणी उचलल्याचा उल्लेख आगवान यांनी शपथपत्रात केला आहे. जायकवाडीतून मोठय़ा प्रमाणात बीअर आणि दारू उद्योगाला पाणी दिले जात असतानाही याचिकाकर्ते मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे त्याबाबत मौन बाळगले. ते कोणताही आवाज उठवत नाहीत, ही बाब याचिकाकर्त्यांच्या हितसंबंधांबाबत पुरेशी बोलकी आहे, या शब्दांत मराठवाडा जनता विकास परिषदेवर आक्षेप नोंदविण्यात आला.
पाटपाणी संघर्ष समितीचे कार्यकर्ते प्रताप सोमवंशी यांनी नांदूर मधमेश्वर प्रकल्पात किती पाणीसाठा असावा व नगर जिल्हय़ात किती पाणी अडविले जात आहे, याची माहिती देत पाण्याच्या मागणीची याचिका दाखल केली. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्ते उद्योग व बीअर कंपन्यांचे हस्तक असून त्यांच्यासाठी मोठय़ा प्रमाणात पाणी मिळावे म्हणून प्रयत्न करीत असल्याचा आरोप युक्तिवादादरम्यान करण्यात आला. याची नोंद न्यायालयाने घेतली.
अश्लाघ्य आरोप- अॅड. देशमुख
मराठवाडय़ाच्या हक्काच्या पाण्यासाठी मराठवाडा जनता विकास परिषद व पाटपाणी संघर्ष समिती गेली कित्येक वर्षे काम करीत आहे. मराठवाडय़ाच्या विकासासाठी गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली पक्षनिरपेक्ष व्यासपीठ म्हणून या दोन्ही संघटना ओळखल्या जातात. या संदर्भात नगर जिल्हय़ातील कार्यकर्त्यांनी केलेले आरोप अश्लाघ्य आहेत. त्याला न्यायालयात उत्तर दिले जाईल, अशी प्रतिक्रिया अॅड. प्रदीप देशमुख यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 1:50 am

Web Title: marathwada janata vikas parishad used as agent of beer companies
Next Stories
1 देशाच्या विभाजनाचा काँग्रेसचा डाव – ठाकरे
2 ‘परभणीचे चित्र बदलण्यासाठी विधानसभेत प्रतिनिधित्व मिळावे’
3 नांदेडची जागा भाजपच लढविणार- फडणवीस
Just Now!
X