सध्या दिवस दुष्काळाचे व पाणीटंचाईचे आहेत. याचे प्रतिबिंब वा समाजात उमटणारे पडसाद टिपण्यासाठी वुई थिएटर ही संस्था सरसावली आहे. या संस्थेने पाणी व दुष्काळ या सध्याच्या सर्वाधिक भेडसावणाऱ्या प्रश्नांवर परखड, विदारक सत्य मांडण्यासाठी ‘मराठवाडा करंडक’ या एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले आहे.
गेल्या १० वर्षांपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविणाऱ्या वुई थिएटरतर्फे या खुल्या स्पर्धेचे आयोजन केले असून, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजक रवींद्र पुरी यांनी केले आहे. ६६६.ें१ं३ँ६िं‘ं१ंल्लिं‘.ू.्रल्ल या संकेतस्थळावर ३० एप्रिलपर्यंत संपर्क साधावा किंवा प्रवेशिका वुई थिएटर (९८६०७९८४६३), एन १२, डी-७/११, हडको, औरंगाबाद या पत्त्यावर पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. विजेत्या संघाला २५ हजार रुपये व मराठवाडा करंडक, दुसरे पारितोषिक १५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह, तिसरे पारितोषिक १० हजार रुपये व स्मृतिचिन्ह, तसेच इतर वैयक्तिक पारितोषिके दिली जाणार आहेत.
दुष्काळाला कवटाळत बसण्यापेक्षा, पाण्यासाठी एखादे महायुद्ध होण्याची वाट बघत बसण्यापेक्षा समाजाचा घटक, सामाजिक बांधिलकी, सुजाण नागरिक, जागरूक रंगकर्मी यापैकी कोणत्याही एका नात्याने आपण वागायचे ठरवले तर पाणीटंचाईचे भीषण परिणाम आपणाला भोगावे लागणार नाहीत. अगदी आपल्या घरापासून प्रत्येकाने जास्तीत जास्त पाणी कसे वाचवता येईल यासाठी आतापासूनच प्रयत्न करावा, म्हणजे सर्वानाच मुबलक नसले, तरी पुरेसे पाणी नक्की मिळेल. नाहीतर पाण्याच्या एका थेंबासाठीसुद्धा रक्ताचे पाट वाहतील. अशी भयावह स्थिती निर्माण होऊ नये, म्हणून या स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती संयोजकांनी दिली.