तब्बल ४ ते ५ दिवसांनतर आले तर टँकरनेच पाणी, त्यासाठी महिला मुलांची झुंबड, टँकरमधून पाणी मिळावे यासाठी अनेक पालक मुलांना शाळेत पाठवायला तयार नाहीत, त्यांच्या पाठीवर दप्तरांऐवजी पाण्याचे हंडे, कळशा, प्लॅस्टिकचे कॅन!
ही स्थिती आहे मराठवाडय़ातील २ जिल्ह्य़ांमधील ९ तालुक्यांमधल्या ४६ गावांची! सलग ६ ते ७ दिवस या गावांमध्ये फिरून, लोकांबरोबर बोलून, चर्चा करून नगर येथील नवमहाराष्ट्र युवा अभियानच्या विद्यार्थ्यांनी राहुरी कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने या गावांमधील दुष्काळ अनुभवला व त्याचा अहवाल त्यावरील उपायांसहीत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना सादर केला. खासदार सुप्रिया सुळे यांच्या मदतीने व मार्गदर्शनाने हे अभियान राबवण्यात आले अशी माहिती संघटक किरण काळे यांनी दिली. मराठवाडय़ात जलसंधारणाच्या कामांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही स्थिती ओढवली असेच या युवकांचे मत झाले आहे.
युवकांची ३ पथके पाहणीसाठी तयार करण्यात आली. ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेली ४६ गावांमध्ये हे युवक गेले व काय स्थिती आहे, त्यावर उपाय काय करता येतील, सध्या तातडीने तात्पुरत्या स्वरुपात दुष्काळग्रस्तांना दिलासा कसा देता येईल, यावर कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो का या दृष्टीने ही पाहणी करण्यात आली. त्यात गावांमधील जुन्याजाणत्या तसेच नवयुवकांनाही बोलते करण्यात आले.या पाहणीचा समारोप आदर्शगाव हिवरेबाजार येथे दुष्काळ परिषद घेऊन करण्यात आला. आदर्श गाव योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार यांच्या सल्ल्यानुसार दुष्काळावर मात करण्यासाठी काय करता येईल याचा मसुदा तयार करण्यात आला व नंतर तो मुंबईत शरद पवार यांच्याकडे देण्यात आला. नदी जोड प्रकल्प तातडीने राबवण्यात यावा, सिंचन प्रकल्पांमधून गाळ उपसण्याची मोहीम त्वरेने सुरू करावी, रोहयोच्या कामावर पाळणाघरे सुरू करावीत, गावेवाडय़ा वस्त्या यांना लोकसंख्येच्या प्रमाणात टँकर मंजूर करावेत, ते नियमीत वेळेतच गावात पाठवावेत, सार्वजनिक टाकीत किंवा विहीरीतच ते रिकामे करावे अशा अनेक मागण्या या मसुद्यात करण्यात आल्या आहेत.
गावांगावांमध्ये जलसंधारणाची कामे झाली पाहिजेत, गावांमधून नेतृत्व पुढे आले तर हे सहज होऊ शकते असे मत या युवकांनी व्यक्त केले. शरद पवार यांनी हा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यास सांगितले असून त्याप्रमाणे लवकरच तो मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना देण्यात येणार आहे अशी माहिती किरण काळे यांनी दिली.