जायकवाडी जलाशयातील पाणीसाठा पिण्यासाठी निश्चितच पुरेसा आहे. तथापि, शेतीच्या एका आवर्तनासाठी पाण्याची नितांत गरज आहे. ती नगर व नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमधून पूर्ण व्हावी, अशा प्रकारचा प्रस्ताव तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या जायकवाडीत २९.५० टक्के पाणीसाठा आहे. मुख्यमंत्र्यांकडेही अशी मागणी तोंडी स्वरूपात करण्यात आली. समन्यायी वाटपाचा नियम लावला तर तो अधिक असेल. किमान रब्बीसाठी एक आवर्तन पाणी सोडता येऊ शकेल, अशी व्यवस्था करण्याची विनंती केली जात आहे. एका आवर्तनास १५० दलघमी पाणी लागते. म्हणजे साधारण ५.२० टीएमसी पाणी जलाशयात पोहोचावे, असे नियोजन राज्यस्तरावरून केले जावे, असे प्रयत्न सुरू झाले आहेत. परंतु त्यास नगर जिल्ह्य़ातील मंत्र्याचा विरोध असल्याचे सांगण्यात आले.
समन्यायी पाणीवाटपाच्या अनुषंगाने ऊध्र्व गोदावरी खोऱ्यातील पाणीवाटप कसे व्हावे, याचा अभ्यास मेंढीगिरी समितीने पूर्वीच सरकारला सादर केला. तो स्वीकारला की नाही, हे मराठवाडय़ातील जनतेला अजून माहीत नाही. परतीच्या पावसाने आधार दिल्यामुळे जायकवाडीतील पाणीसाठा पिण्याची गरज भागविण्याइतपत झाला आहे. रब्बीच्या पिकांसाठी एक आवर्तन मिळाले तरी दुष्काळात होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकेल, अशी मांडणी मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आली. सोमवारी या अनुषंगाने जलसंपदाच्या विभागाच्या सचिवांनी टेली कॉन्फरसिंगवर आढावाही घेतल्याचे सांगण्यात आले.
‘नारंगी-सारंगी’ त पाण्यासाठीही प्रयत्न
दरम्यान, पाण्याचे टँकर सुरू असणाऱ्या वैजापूर तालुक्यातील नारंगी व सारंगीत साडेसहा दलघमी पाणी पालखेड धरणातून सोडावे, ही मागणीही सोमवारी करण्यात आली. नाशिक जिल्ह्य़ातील जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तशी विनंती केल्याचे सांगण्यात आले. उद्या (मंगळवारी) वैजापूरचे नेतेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत. नवनिर्वाचित आमदार सुभाष झांबड, माजी आमदार कैलास पाटील चिकटगावकर व राष्ट्रवादीचे भाऊसाहेब चिकटगावकर यांच्यासह शिष्टमंडळ मुंबईस जाणार आहे. या धरणाच्या पाण्यावर वैजापूर शहर व २० गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असल्याने हे पाणी मिळावे, यासाठी प्रशासकीय स्तरावरही पाठपुरावा सुरू झाला आहे.