डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र जालना येथे सुरू करावे, अशी मागणी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. शिवाजी मदन यांनी केली. परिषदेची बैठक उद्या (मंगळवारी) होत असून त्या वेळी हा प्रस्ताव चर्चेस येणार आहे.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात जवळपास ४०० महाविद्यालये असून सध्या उस्मानाबाद येथे उपकेंद्र आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या धोरणानुसार राज्यात नवीन विद्यापीठे अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. भविष्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात महाविद्यालयांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने जालना व बीड येथे उपकेंद्रांची स्थापना होणे आवश्यक असल्याचे डॉ. मदन यांनी प्रस्तावात म्हटले आहे. या संदर्भातील प्रस्ताव कुलगुरूंकडे देण्यात आला. डॉ. आघाव, डॉ. रत्नदीप देशमुख, डॉ. गणेश शेरकर, डॉ. आबासाहेब हुंबे, डॉ. जी. एम. पाटील, डॉ. पी. जी. जाधव आदींच्या या प्रस्तावावर सहय़ा आहेत. विद्यापीठाच्या आगामी वर्षांच्या अंदाजपत्रकांमध्ये या उपकेंद्रासाठी तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे.