केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भगव्या दहशतवादाबद्दल केलेल्या विधानाच्या निषेधार्थ हिंदुत्वादी संघटनांच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. हिंदुत्वाविषयी बेताल वक्तव्ये करणाऱ्यांना आळा घालावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.    
जयपूर येथे झालेल्या काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिरावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी देशात भगवा दहशतवाद पसरत असल्याचे विधान केले होते. शिंदे वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हिंदुत्वादी संघटनांनी शहरातून निषेध फेरी काढली. हिंदु एकता हॉलपासून निषेध फेरीची सुरुवात झाली. श्री.यादव महाराज यांनी धर्म ध्वजाची पूजा केल्यानंतर फेरीला प्रारंभ झाला. बिनखांबी गणेश मंदिर, शिवाजी चौक, लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नरमार्गे फेरी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. यामध्ये आमदार राजेश क्षीरसागर, विनायक साळोखे, डॉ.मानसिंग शिंदे, बापुसाहेब पुजारी यांच्यासह ५०० वर नागरिकांचा समावेश होता. तेथे शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.    
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बापुसाहेब जोशी, हिंदू एकता आंदोलनाचे दिलीप भिवटे, हिंदू जनजागृती समितीचे बाबासाहेब भोपळे, गजानन जाधव, बजरंग दलाचे उमेश उरसाल यांची भाषणे झाली. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.