खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून त्यासाठी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न, खासदार निधीतील कामांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
दरम्यान २१ जानेवारीच्या शरद पवारांच्या सातारा दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर उदयनराजे आपली दिल्लीभेट आटोपून रविवारीच २० जोवारीला साताऱ्यात येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीच्या कामाला लागण्याची सूचना केली असल्याची शक्यता सद्या जिल्ह्य़ात वर्तविण्यात येत आहे. त्यामुळेच उदयनराजे यांनी आपल्या धडाकेबाज स्टाईलमध्ये मतदारसंघात फिरण्यास सुरुवात केली आहे. सद्या तरी फक्त मतदारसंघातले प्रलंबित प्रश्न, वेगवेगळी धरणे आंदोलने गाववार भेटीगाठी व खासदार निधीतील कामांच्या पूर्णत्वाच्या दृष्टीने त्यांनी आपला लवाजमा कामाला लावला आहे.
जिथे जाईल तिथे अधिकाऱ्यांना बोलावून त्या त्या कामाची तड लावण्याची व कामासंबंधी चर्चा एवढाच कार्यक्रम घेऊन ते फिरत आहेत. या वेळी कोणावरही टीका टिप्पणी करत नाही. वाईचाही असाच धावता दौरा त्यांनी नुकताच केला.
नागेवाडी धरण होऊन १० वर्षे झाली परंतु त्याला कालवे नसल्याने पाणी शिवारात पोहोचले नाही. त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला असून कालव्याची कामे बऱ्यापैकी झाली आहेत. मात्र नागेवाडीतील प्रकल्पग्रस्तांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत. नुकतीच या विषयावर आ. मकरंद पाटील यांनी प्रकल्पग्रस्त व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कालव्याचे काम सुरू ठेवण्याची विनंती प्रकल्प ग्रस्तांना केली होती. त्याचप्रमाणे पंधरा दिवसात प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. याच प्रकल्पग्रस्तांना वाईला बोलवून उदयनराजेंनीही चर्चा केली. अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. चर्चा करताना भोसले म्हणाले, कामे अडकली की लोक आमदाराला, खासदाराला आणि मंत्र्याला वेगवेगळे सांगत असतात, असे करू नका. तर आपले काम होण्यावर भर द्या. ज्यानी काम अडवलंय त्याला आत्महत्या करायला मजबूत करा, त्यासाठी कोणी आत्महत्या करू नका. त्यानंतर त्यांनी बावधन (ता. वाई)च्या ग्रामस्थांशी चर्चा केली.
एकूणच त्यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे त्यांच्या सावध बोलण्याच्या भूमिकेतून जाणवत होते. सध्या तरी त्यांनी जिल्ह्य़ात सर्वानाच आपले म्हणत आपला वारू पुढे ढकलला आहे.