इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती रद्द करावी, नवीन रिक्षा परवाने देण्यास सुरूवात करावी, या व अन्य मागण्यांसाठी इचलकरंजीतील रिक्षाचालकांनी बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात तीनशेहून अधिक रिक्षाचालक सहभागी झाले होते. रिक्षा व्यवसाय अलीकडे इंधन दरवाढ, दुरूस्ती खर्च, कर्ज अशा विविध कारणांमुळे अडचणीत आला आहे. अशातच मोटरवाहन कायद्यानुसार सर्व नियम लागू झाल्याने रिक्षाचालक हैराण झाले आहेत.
जुन्या रिक्षांना सुमारे ५ हजार किमतीचे नवीन मीटर बसविण्याची सक्ती केली जात आहे. यामुळे रिक्षा व्यावसायिकांच्या समस्येमध्ये भर पडत चालली आहे. या नियमात बदल करून नव्याने वापरात येणाऱ्या रिक्षांना जुन्या पध्दतीचीच मीटर बसवावित, अशी त्यांची मागणी आहे. या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.राजर्षी शाहू छत्रपती पुतळ्यापासून रिक्षाचालकांच्या मोर्चाला सुरूवात झाली. महाराष्ट्र रिक्षाचालक संघटनेच्यावतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे नेतृत्व दशरथ मोहिते, अशोक कोलप, अलताफ शेख,रामचंद्र कचरे, रामचंद्र जाधव, विद्यार्थी वाहतूक संघटनेचे मन्सूर सावनुरकर, जीवन कोळी, इंदिरा अॅटोयुनियनचे लियाकत गोलंदाज, सदा जांभळे, रिक्षाचालक मालक सेनेचे धनंजय हिंगमिरे, स्वप्निल बोरे आदींनी केले.    शहरातील मुख्यमार्गाने फिरून मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. तेथे रिक्षाचालकांनी निदर्शने केली. प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये परवाना, रिन्यूअल मुदत पाच वर्षे करावी, विमा रक्कम परत मिळावी, तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर रिक्षाचालकांना सामाजिक व कल्याण निधी लागू करावा, एक घर एक वाहन कायदा लागू करावा, रिक्षांवरील जाचक अटी रद्द कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या. रिक्षाचालकांनी वारंवार आंदोलन करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. आंदोलनाची दखल न घेतल्यास राज्यभर उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.