एकीकडे संपूर्ण ऑटोमेशन करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलल्याबद्दल पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे कौतुक होत असताना, दुसरीकडे मात्र, लांबलेल्या निकालांमुळे परीक्षा विभागाच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. पुणे विद्यापीठाच्या मार्चमधील परीक्षा पुढे जाण्याची शक्यता परीक्षा विभागातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.
पुणे विद्यापीठाच्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या बहुतांश परीक्षांचे निकाल अजून जाहीर झालेले नाहीत. विद्यापीठाने यावेळी पहिल्यांदाच काही अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम विद्यापीठाच्या आवारात सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुळातच पूर्ण तयारी अभावी घेतलेल्या निर्णयामुळे कॅप सेंटर्स विद्यापीठामध्ये की महाविद्यालयांमध्ये या वादात बराच वेळ गेला. या टप्प्यापासूनच ऑक्टोबर परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे आणि पर्यायी निकालाचे काम लांबत गेले. अजूनही ऑक्टोबरमध्ये झालेल्या काही अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले नाहीत. ऑक्टोबरमधील निकाल हातात आल्याशिवाय विद्यार्थ्यांला नक्की कोणत्या विषयांची परीक्षा द्यायची आहे, आधी झालेल्या परीक्षेमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण आहे का, अशा बाबी कळत नाहीत. परीक्षेचे अर्ज भरताना आधीच्या परीक्षेचे तपशील देणे आवश्यक असते. त्यामुळे ऑक्टोबरच्या परीक्षेचे निकाल जाहीर न झाल्यामुळे, विद्यापीठाने पुढील परीक्षांचे अर्ज अजून खुले केलेले नाहीत. त्यामुळे मार्चमधील परीक्षेसंदर्भातील पुढील सर्वच प्रक्रिया लांबणार आहेत. त्यामुळे मार्चमधील परीक्षा पुढे जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. विद्यापीठाच्या संथ कारभाराचा विद्यापीठाशी बांधल्या गेलेल्या साधारण सहा लाख विद्यार्थ्यांवर परिणाम होणार आहे.