महिन्याभराचा कालावधी उलटूनही यंत्रमाग कामगारांच्या मजुरीचा प्रश्न अद्यापही लोंबकळत पडला असून ‘बोनस’शिवाय चर्चा नाहीच, या निर्धारावर ठाम रहात यंत्रमागधारकांनी आज प्रचंड मोर्चाद्वारे आपली एकजूट दाखवून दिली. वस्त्रनगरीच्या इतिहासातील यंत्रमागधारकांचा हा पहिलाच इतका प्रचंड मोर्चा ठरला. तीन वर्षांचा लेखी करार, १६.६६ टक्के बोनस, खर्चीवाला कारखानदारांची मजुरी आणि प्रचलित पध्दतीनेच काम, या मुद्यांवर यंत्रमागधारकांची निर्गत झाल्याशिवाय मजुरीवाढीची चर्चा करणार नाही, अशा आशयाचे निवेदन प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांना दिले आहे. यंत्रमागधारकांवर टीकास्त्र सोडणारे कामगार नेते मिश्रीलाल जाजू हे या मोर्चातील चर्चेचा विषय बनले होते. जाजूंवरील टीकांचे फ़लक सर्वाचेच लक्ष वेधून घेत होते.
२१ जानेवारीपासून यंत्रमाग कामगारांनी मजुरीवाढ प्रश्नी कामबंद आंदोलन छेडले आहे. गत महिन्याभरात या प्रश्नावर कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या. पण कधी कामगार नेते तर कधी यंत्रमागधारक आपापल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने कोणताच निर्णय होऊ शकला नाही. थेट मुंर्बइपासून ते कोल्हापूर, इचलकरंजीत झालेल्या बैठकीत सकारात्मक असा तोडगा निघू शकला नाही.
बोनसचा प्रश्न मिटवा मगच मजुरीवाढीवर बोलू, अशी भूमिका यंत्रमागधारक संघटनांनी घेत यावर तातडीने निर्णय व्हावा या मागणीसाठी आज प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. या आवाहनाला शहर आणि परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी १० वाजल्यापासून भागाभागातील कारखानदार गटागटाने शाह पुतळा येथे जमू लागले होते. ११ वाजता इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतिश कोष्टी, राष्ट्रवादी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष विश्वनाथ मेटे, कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष दीपक राशिनकर, यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन, पॉपलिन यंत्रमागधारक कृती समितीचे अध्यक्ष सचिन हुक्किरे, सागर चाळके यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचा सुरुवात करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरुन फ़िरुन हा मोर्चा प्रांत कार्यालयावर आला.
  चौकातच हा मोर्चा अडविण्यात आला.  त्यामुळे यंत्रमागधारकांनी रस्त्यावरच ठिय्या मारला.  या मोर्चातील डिजीटल फ़लकांनी विशेषत: कामगार नेते मिश्रीलाल जाजू यांच्यावरील टिप्पणींनी सर्वाचेच लक्ष वेधून घेतले होते. यावेळी मोर्चाला मार्गदर्शन करताना बोनसचा मुद्दा मिटल्याशिवाय चर्चा नाही असे सांगताना अनेक कारखानदारांनी गत ३५ दिवसांपासून शहराला वेठीस धरणाऱ्या कामगार नेत्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.
मोर्चाच्यावतीने मालक प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या वेळी बोलताना मालक प्रतिनिधींनी सर्वच यंत्रमागधारक बोनसवर ठाम असून मालकांनी अशक्य अशी तडजोड केली आहे. त्यामुळे बोनसचा प्रश्न मिटवून लवकरात लवकर निर्णय करावा. यंत्रमागधारकांच्या भावना कळविण्यासाठीच हा मोर्चा असून दिवाळीत पुन्हा आंदोलनाचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बोनसवर प्रथम चर्चा करावी असे सांगितले. या वेळी राजगोंडा पाटील, सुभाष जाधव, पुंडलिक जाधव, नारायण दुरुगडे आदींसह सुमारे ८ हजार यंत्रमागधारक उपस्थित होते.