दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने कार्यक्रम संचालन प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. विविध प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये संचालन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. संचालन शिकण्यासाठी कोणतेही इन्स्टिटय़ूट उपलब्ध नाही. त्यामुळे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने ही अभूतपूर्व प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे.

१८ ते ४० वष्रे वयाची, बारावी पास असलेली व्यक्ती या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतात. सहा दिवसीय प्रशिक्षणाच्या या बॅचमध्ये ३० प्रशिक्षणार्थ्यांना सहभागी होता येईल. भारतातील कोणत्याही शहरातील हिंदी व इंग्रजी येणारी व्यक्ती यात सहभागी होऊ शकतात. स्क्रिनिंग टेस्टद्वारे प्रथम प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात येईल आणि निवड झालेल्या ३० प्रशिक्षणार्थ्यांना ९ ते १४ जूनदरम्यान संचालन क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करतील. कार्यशाळेत उद्घोषणा विभागातील मान्यवरांचे मार्गदर्शन, ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरण, शैक्षणिक भेट आदी सुविधांचा समावेश आहे. यामुळे प्रशिक्षित उद्घोषकांचे भविष्य उज्ज्वल होणार असून, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने सुद्धा विविध कार्यक्रमातून त्यांना संधी देण्यात येणार आहे.  संचालन प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी होण्याकरिता अर्ज केंद्राच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. स्क्रिनिंगकरिता २०० रुपये शुल्क त्याचवेळी आकारण्यात  येईल. १ जूनला होणाऱ्या स्क्रीन टेस्टमध्ये निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना ९ जूनपासून प्रशिक्षण देण्यात येईल. अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना केंद्राच्यावतीने प्रमाणपत्र देण्यात येईल. या प्रशिक्षण कार्यशाळेत जास्तीतजास्त प्रशिक्षणार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्राचे संचालक डॉ. पीयूष कुमार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, सिव्हील लाईन्स, आमदार निवासासमोर, दूरध्वनी क्र. ०७१२-२५६२९७४ किंवा दीपक कुलकर्णी ७७६७८०२२५१, दीपक पाटील ७७६७८०२२६० यांच्याशी संपर्क साधावा.