20 April 2019

News Flash

सागरी रक्षण करणाऱ्या पोलिसांना पोहताच येत नाही!

मुंबईच्या सागरी किनाऱ्याची सुरक्षा सागरी पोलिसांकडे आहे, परंतु भर समुद्रात बोटीतून गस्त घालणाऱ्या सागरी पोलिसांना पोहताच येत नसल्याचे उघड झाले

| July 10, 2015 06:43 am

मुंबईच्या सागरी किनाऱ्याची सुरक्षा सागरी पोलिसांकडे आहे, परंतु भर समुद्रात बोटीतून गस्त घालणाऱ्या सागरी पोलिसांना पोहताच येत नसल्याचे उघड झाले आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर पोलीस करणार काय, असा प्रश्न आहे. त्यामुळेच आता  पोलिसांना पोहण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. विशेष म्हणजे नौदलाच्या वतीने हे पोलीस प्रशिक्षण देण्यात येत आहे.
दक्षिण मुंबईचा सागरी किनारा बंदर परिमंडळ (पोर्ट झोन) येतो. यलो गेट आणि सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत समुद्राची हद्द येते. त्यामुळे या दोन पोलीस ठाण्यातील पोलिसांना समुद्रात गस्त घालून निगराणी ठेवण्याचे काम करावे लागते. मात्र येथील अनेक पोलिसांना पोहताच येत नसल्याची बाब बंदर परिमंडळाचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या लक्षात आली. बोटीवर समुद्रातून गस्त घालून सागरी सुरक्षा करायची तर पोहायला यायलाच हवे, यासाठी त्यांनी मग पोलिसांना पोहण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नौदलाची मदत घेण्यात येत आहे. या दोन्ही पोलीस ठाण्यात एकूण साडेचारशे कर्मचारी बंदोबस्ताच्या कामात आहेत. परंतु त्यातील २३० पोलिसांना पोहता येत नसल्याने त्यांना हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. वरळी येथील तरणतलावात आठवडय़ातून तीन दिवस एक तास हे प्रशिक्षण देण्यात येते अशी माहिती उपायुक्त चव्हाण यांनी दिली. महिनाभर हे प्रशिक्षण चालणार आहे. ते पूर्ण झाल्यावर त्यांना समुद्रात पोहण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पोलीस हवालदार पासून पोलीस उपनिरीक्षकपर्यंतच्या अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
..नवीन डिग्गी मागविणार
मुंबई पोलिसांकडे २० बोटी असून १९ एम्फिबियस बोटी (जमिनीवर आणि पाण्यावर चालणारे वाहन) आहे. परंतु या बोटी मोठय़ा असल्याने थेट किनाऱ्यापर्यंत येऊ शकत नाही. त्यासाठी छोटय़ा  डिग्गीची आवश्यकता असते. सध्या असणाऱ्या डिग्गी या निकामी झाल्या असून नवीन १० डिग्गीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. याशिवाय ४५० स्थानिकांना सागरी रक्षक दलात सहभागी करून घेतले जाणार आहे. स्थानिक रहिवाशी आणि खलाशांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना सागरी रक्षक बनवले जाते. समुद्रात असताना काही संशयास्पद आढळल्यास ते त्वरित पोलिसांना माहिती कळवतात. त्यांचा जागता पहारा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरतो. हे सागरी रक्षक मुंबई पोलिसांचे कान आणि डोळे असतात. सागरी सुरक्षेसाठी १०९३ या क्रमांकाची हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली असून कुणाला समुद्र आणि किनाऱ्याच्या परिसरात काही संशयास्पद आढळले तर या हेल्पलाइनवर संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

First Published on July 10, 2015 6:43 am

Web Title: marine security police dont know how to swim
टॅग Marine Security