अवेळी पावसामुळे अनेक महिने गगनाला भिडलेले भाजीपाल्याचे भाव आता जरा स्थिरावू लागले आहेत. मुंबई परिसराला भाजीपाला आणि कांदा-बटाटय़ाचा पुरवठा करणाऱ्या वाशीच्या घाऊक बाजारात सध्या वर्षांतील सगळ्यात स्वस्ताईचा माहोल आहे. गेल्या पंधरवडय़ापर्यंत ५५ ते ६० रुपये किलो दराने विकला जाणारा उत्तम प्रतीचा कांदा दर बुधवारी सकाळी २० रुपयांपर्यंत खाली आला होता. तर टोमॅटोही २२ रुपयांपर्यंत उतरला होता. कोबी, फ्लॉवर आदी भाज्या तर येथे जेमतेम ४ ते ८ रुपये किलोने विकल्या जात आहेत. लसूणही ६० रुपयांन मिळत आहे. मात्र संतापाची बाब म्हणजे वाशीतील ही स्वस्ताई मुंबईतील किरकोळ भाजीबाजारात कुठेच दिसत नाही. मुंबईच्या बाजारांमध्ये भाज्या अजूनही ४० ते ६० याच टप्प्यात अडकलेल्या आहेत. किरकोळ व्यापाऱ्यांनी चालविलेल्या या लुटीकडे सरकार आणि लोकप्रतिनिधींनी पूर्ण दुर्लक्ष केले आहे. आधी भाज्या महाग असताना त्यावर अवाच्या सवा नफा कमावणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांची लूट आता तर तुलनेत अधिकच वाढली आहे.
गेल्या काही वर्षांपासून भाज्यांच्या दरांमध्ये अत्यंत कमी कालावधीत मोठे चढउतार होत आहेत. प्रतिकूल हवामानामुळे अगदी महिनाभरापर्यंत न परवडणाऱ्या किंमती असलेल्या भाज्यांच्या दरांत गेल्या आठवडय़ापासून अभूतपूर्व घसरण सुरू झाली आहे. कांदा, टोमॅटो, बटाटा, लसूण, भेंडी, गवार असा सगळेच स्वस्त झाले आहे. जूनपासून कांद्याने खरोखरच डोळ्यात पाणी आणल्यानंतर आता तो चेहऱ्यावर हसू आणत आहे. मुंबईला दररोज किमान १०० गाडी कांदा लागतो. हे प्रमाण कायम राहिल्यास कांदा आवाक्यात राहतो, असा अनुभव आहे. मागील चार महिने हे प्रमाण ६० ते ८० गाडय़ांच्या आसपास होते. नव्या कांद्याचे पीक सुरू होताच आवक वाढली आणि ५० ते ६० रुपयांचा कांदा १५ ते २५ रुपयांवर उतरला. मात्र आजही किरकोळ बाजारात तो ४० रुपयांनी विकला जात आहे.
भाज्यांची स्वस्ताई
घाऊक दरांमधील ही स्वस्ताई अन्य अनेक भाज्यांच्या बाबतीतही अनुभवाला येत आहे. टोमॅटो आता १८ ते २२ रुपयांपर्यंत खाली आला असल्याची माहिती भाजीपाला बाजाराचे संचालक शंकर िपगळे यांनी वृत्तान्तला दिली. घाऊक बाजारात सध्या किलोमागे फ्लॉवर (४ रुपये), कोबी (८ रुपये), काकडी (८ रुपये), वांगी (४ रुपये) असे प्रमुख भाज्यांचे दर आहेत. एरवी श्रीमंतांची भाजी अशी ओळख असणारा वाटाणा ३० रुपयाने विकला जात असून गवार (३०), फरसबी (१८) या भाज्याही आवाक्यात आल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी २०० रुपयांवर गेलेले उत्तम प्रतीचे आले आता ५० रुपयांवर घसरले आहे
घाऊक बाजारात ही स्वस्ताई असली तरी मुंबईत सर्वत्र किरकोळ बाजारात व्यापाऱ्यांची दांडगाई सुरूच आहे.