शंभर एकर जागेत उभारलेल्या आणि अत्याधुनिक बाजार समिती म्हणून गवगवा झालेल्या येथील नामदार शरदचंद्र पवार बाजार समितीच्या सार्वजनिक शौचालयाचे दरुगधीयुक्त दूषित पाणी चिंचखेड व उंबरखेड शिवारातील शेतकऱ्यांच्या थेट बांधांवर व विहिरीत पोहचल्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. शौचालयाची घाण, दरुगधी येत असलेले पाणी विहिरींपर्यंत आल्याने या शिवारातील पाणी पिण्यासाठी अयोग्य झाले आहे.
याशिवाय परिसरातील कुक्कुटपालन केंद्र आणि बाजार समितीपासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर असलेला वाइन प्रकल्पही धोक्यात आला आहे. बाजार समितीत असलेल्या सुलभ शौचालयाची टाकी भरल्यामुळे दरुगधीयुक्त पाणी गटारीव्दारे समितीच्या दरवाजाजवळ सोडून देण्यात आले असून, हे पाणी शिवार नाल्याव्दारे बांधाबांधाने परिसरातील शेकडो विहिरींपर्यंत पोहचले आहे. गुरूवारी येथील वाइन प्रकल्पाचे संचालक विश्वास मोरे यांच्या तक्रारीवरून बाजार समिती सचिव संजय पाटील व काही कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात व विहिरींची पाहणी केल्यानंतर हा गंभीर प्रकार लक्षात आला. सचिव संजय पाटील यांनी तातडीने उपाय योजना करण्याची ग्वाही दिली असली तरी सुलभ शौचालयाचा वापर लक्षात घेता आणि टाकीची क्षमता लक्षात घेता तातडीने उपाय योजना करणे शक्य नसल्याचे स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. नवीन जागेत बाजार समितीचे स्थलांतर करताना या ठिकाणी शौचालयासाठी तीन गट उभारण्यात आले आहेत. बाजार आवारात वास्तव्य असलेले व्यापारी, कामगार यांची संख्या किमान दहा हजारपेक्षा अधिक असून त्यांच्याकडून सुलभ शौचालयाचा वापर केला जात आहे. त्यामुळे साहजिकच हे दरुगधीयुक्त पाणी दररोज शिवार नाल्यात पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आलेले संकट बाजार समितीने त्वरित दूर करावे अशी मागणी विश्वास मोरे, संपतराव विधाते, विठोबा शिंदे, भानुदास विधाते, गणपत विधाते, विठ्ठलराव आथरे व इतर शेतकऱ्यांनी केली आहे.
आपला वाइन प्रकल्प ज्या विहिरींच्या पाण्यावर अवलंबून आहे, त्याच विहिरीत हे पाणी उतरल्याने प्रकल्प धोक्यात आला आहे. तसेच हे दरुगधीयुक्त पाणी नाल्याव्दारे कादवा नदीत गेल्याची भीती सायलो वाइनचे संचालक विश्वास मोरे यांनी व्यक्त केली. समितीने शिवार नाल्यात सोडलेले शौचालयाचे पाणी त्वरित बंद करावे. संयुक्त शेती संस्थेच्या विहिरीत हे सर्व पाणी साचले असल्याची तक्रार संपतराव विधाते यांनी केली आहे. पिंपळगाव बाजार समितीचे सचिव संजय पाटील यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी योग्य असल्याची भूमिका मांडली. बाजार समिती टाकीसाफ करण्यासाठी यंत्रणा खरेदी करणार असून दर आठवडय़ाला टाकीची स्वच्छता करण्यात येणार आहे. हा प्रकार अति पाणी वापरामुळे झाला असून, काही दिवसांपूर्वी बरेच कामगार व व्यापारी एकेक तास आंघोळ करत असल्याचे समितीच्या निदर्शनास आले होते. तर स्वच्छतागृहातील काही नळाच्या तोटय़ा चोरीला गेल्यामुळे आता स्नानगृहात बादलीने पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले. बाजार समिती सभापती दिलीप बनकर यांनी परिसरात नुकताच झालेला पाऊस आणि गटारीचे पाणी एकत्र होऊन कदाचित असा प्रकार झाला असावा अशी शंका व्यक्त केली. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही अशी व्यवस्था करण्यात येईल असेही ते म्हणाले.