अवघ्या काही दिवसांवर आलेली दिवाळी पाहता बाजारात खरेदीची लगबग सुरू झाली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ईलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोन्या- चांदीचे दागिने, दुचाकी, चारचाकी वाहनासह नवीन घर घेण्यासाठी आकर्षक सूट आणि योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.  
साधरणत: दसरा आटोपल्यावर घरोघरी दिवाळीचे वेध लागल्यावर घराची साफसफाई आणि विविध वस्तूंची खरेदीसाठी बाजारात गर्दी उसळते. दिवाळीला जवळपास आठ दिवसाचा कालावधी शिल्लक असून शहरातील इतवारी, महाल, सीताबर्डी, गोकुळपेठ, सक्करदरा, सदर आदी भागातील बाजारपेठ विविध वस्तूंनी सज्ज झाली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी आणि दुकांनदारांनी यावेळी विविध वस्तूंवर सूट जाहीर केली आहेत त्यामुळे त्याचा फायदा ग्राहक विविध वस्तूंची खरेदी करीत असतात. साधारणत: धनत्रयोदशी किंवा लक्ष्मीपूजनला घरामध्ये नवीन वस्तू घेण्याची प्रथा असल्यामुळे अनेक लोक वस्तूंची आगाऊ बुकिंग करून ठेवतात. दुचाकी, चारचाकी वाहनासाठी शहरातील विविध वाहन विक्रेत्यांकडे ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. वाहन विक्रेत्यांनी ग्राहकांसाठी विविध आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत.
सोने आणि चांदीच्या वाढलेल्या किंमती बघता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सराफा बाजारात दुकानदारांनी दागिन्यांवर आकर्षक सूट जाहीर केली आहे. शहरातील विविध मॉल्समधील शो रूम दिवाळीनिमित्त सज्ज झाल्या आहेत. शहरातील सीताबर्डी, महाल , गोकुळपेठ, सक्करदरा, सदर, गोकुळपेठ, वेस्ट हायकोर्ट आणि इतवारी बाजारपेठेतील किराणा, रेडिमेट कपडय़ाची, फटाक्याची , इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुकाने सजून तयार आहेत. कपडे, फर्निचर, टीव्ही, फ्रिजसारख्या वस्तू, आकाशकंदील, फटाके, भेटकार्ड, फराळाचे तयार पदार्थ, तसेच किराणा दुकानात मात्र खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसू लागली आहे. एरवी सीताबर्डी आणि इतवारीतील बाजारपेठ रविवारी बंद असताना ती सुरू होती. तरुणाईचा कल स्मार्टफोन आणि टॅबलेटकडे असल्याने वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल बाजारात विक्रीसाठी आले आहेत.
या शिवाय विजेचे दिवे, दिव्यांच्या माळा, आकाश दिवे, कापड, साडय़ा आदींचे ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी दुकानदारांनी दुकाने सजवली आहे. अनेक ठिकाणी सेल, सवलतीचे फलक झळकत आहेत. पणत्यांचे ढीग बाजारात दिसत आहेत. याशिवाय विविध आकारातील मेणबत्त्या, मेणाचे दिवे, विविध रंगांच्या रांगोळ्या, लक्ष्मीच्या मूर्ती व छायाचित्रे आदींची दुकाने आहेत. सराफा, सुकामेव्याची दुकानेही सज्ज आहेत. बाजारात खरेदी सुरू झाली आहे. बाजारात जी काही थोडी फार गर्दी आहे ती काही विशिष्ट दुकानातच. विशेषत: किराणा व धान्य दुकानात दर महिन्यासारखी नित्याची गर्दी आहे. किराणा तसेच दिवाळीसाठी लागणारी जास्तीची खरेदी केली जात आहे. याशिवाय पणत्या, आकाशदिवे, इलेक्ट्रिक माळा, कापड आदींची खरेदी सुरू आहे. सुकामेवा दुकानातही थोडीफार गर्दी दिसू लागली आले. कामकाजाचे दिवस असल्याने तसेच शाळांमध्ये परीक्षा सुरू असल्याने गर्दी कमीच आहे. शनिवार व रविवार सुटीचे दिवस आहेत. त्यामुळे शनिवारपासून बाजारात प्रचंड गर्दी होईल, अशी आशा व्यापारांना आहे.
शहरातील काही ठिकाणी दिवाळीनिमित्त विविध वस्तूचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. या प्रदर्शनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. शोभेच्या वस्तू, आकाशकंदील, पणत्या, भेटकार्ड, तोरणे, रांगोळी, रांगोळीचे रंग, सुगंधी द्रव्य, अत्तरे, भेट द्यायच्या विविध वस्तू, कपडे,चादरी, आयुर्वेदिक औषधे, महिलांसाठीची सौंदर्यप्रसाधने, दिवाळीचा फराळ यांसह अनेक वस्तूची खरेदी बाजारपेठेत केली जात आहे.