साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजयादशमीनिमित्त नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील बाजारपेठांना वेगळीच झळाळी प्राप्त झाली असून ‘रिअल इस्टेट’पासून ते सुवर्णपेढय़ांपर्यंत, इलेक्ट्रॉनिक्स व घरगुती वस्तू, वाहन अशा विविध व्यावसायिकांनी ग्राहकांवर सवलतींचा वर्षांव केला आहे. सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसात बरेच चढ-उतार झाले असले तरी या मुहूर्तावर भाव काहीसे खाली आल्यामुळे जळगाव व नाशिक या प्रमुख शहरांसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील सराफी बाजारपेठांत ग्राहकांची पावले पडत आहेत. विजयादशमीच्या दिवशी सोने घेण्यासाठी अनेकांनी आगाऊ नोंदणीही केली आहे.
नवरात्रोत्सवाच्या अंतिम टप्प्यात उत्साह शिगेला पोहोचला असताना दसऱ्याच्या पूर्वसंध्येला नागरिकांची पूजा साहित्य खरेदीसाठी मुख्य बाजारपेठेत एकच झुंबड उडाली. दसऱ्याला आपटय़ांची पाने आणि झेंडूच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूजाविधी तसेच सजावटीसाठी वाढलेली मागणी पाहता प्रमुख बाजारपेठांमध्ये पिवळ्या व केशरी रंगातील झेंडूची पखरण झाली. मात्र मागणी आणि पुरवठय़ाचे गणित बिघडल्याने फुलांच्या किमतीने शेकडय़ासाठी शंभरी ओलांडली आहे. सजावटीसाठी वापरण्यात येणारे शेवंती २०० रुपये प्रतिकिलो, अ‍ॅस्टर १६०-१८०, लाल झेंडू ८०-१००, पिवळा झेंडू १८०-२००, गुलाब १८० रुपये किलोने विक्री झाली. सायंकाळी उशिरानंतर भाव काहीसे खाली उतरले. गंगापूर, शिंदे-पळसे, दिंडोरी तसेच निफाड परिसरात शेतकऱ्यांनी झेंडूची फुले मुख्य बाजारपेठेतील हमरस्त्यावर विक्रीस आणली. त्या फुलांची ६० ते ८० रुपये शेकडा दराने विक्री झाली. आपटय़ाची पाने ५ रुपये जुडी दराने उपलब्ध होती.
दरम्यान, वास्तू, वाहन तसेच सोने खरेदीसाठी दसऱ्याचा मुहूर्त योग्य मानला जात असल्याने इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने, वाहने आदी वस्तूंची ग्राहकांनी मोठय़ा प्रमाणात आगाऊ नोंदणी केली. व्यावसायिकांनी वेगवेगळ्या योजना उपलब्ध करत ग्राहकांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यात कर्जसुविधा, दसऱ्यानिमित्त खास सवलत, भेटवस्तू, सोडत आदी उपक्रमांचा समावेश आहे. घरकुल खरेदीला या मुहूर्तावर मिळणारे प्राधान्य लक्षात घेऊन बांधकाम व्यावसायिकांनी अनेक योजना मांडल्या. चौरस फुटाच्या दरात खास सवलत, गृहोपयोगी साहित्याची मोफत उपलब्धता, नोंदणी शुल्क व इतर शुल्क माफ आदी सवलतींचा वर्षांव होत आहे. यामुळे ग्राहकांनी मग ही संधी न दवडता आपली गरज लक्षात घेऊन घरकुल तसेच वस्तू खरेदीचा सपाटा लावल्याचे पाहावयास मिळाले.
विजयादशमीला सोने खरेदीला विशेष महत्त्व आहे. बाजारपेठेतील उत्साहात सर्व व्यावसायिक एका बाजूला आणि सराफी व्यावसायिक दुसऱ्या बाजूला असे चित्र आहे. दसऱ्याच्या दिवशी सोन्याचे भाव काय राहणार, याविषयी ग्राहकांमध्ये उत्सुकता आहे. मात्र, गत काही महिन्यांतील दराचा आढावा घेतला तर या वर्षी ग्राहकांना नेहमीच्या तुलनेत कमी भावात सोने-चांदी खरेदीचा मुहूर्त साधता येणार आहे. देशातील सुवर्णनगरी म्हणून परिचित असणाऱ्या जळगावसह नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील सराफ बाजारात या मुहूर्तावर नेहमी चांगला ‘ट्रेड’ पाहावयास मिळतो. त्यातच, काही महिन्यांपूर्वी सोन्याचे ३० ते ३२ हजार प्रतितोळे तर चांदी साधारणत ५० हजाराच्या जवळपास होते. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सोन्याचे भाव २७ हजार ३५० रुपये (मूल्यवर्धित कर अतिरिक्त) तर चांदीचे प्रतिकिलोचे भाव ४० हजार रुपये असल्याचे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र ओढेकर यांनी सांगितले. ही बाब ग्राहकांच्या खरेदीला प्रोत्साहन देणारी ठरू शकते. ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी सराफी व्यावसायिकांनी सोडतीद्वारे रंगीत टीव्ही संच अथवा फ्रिज, मजुरीत विशेष सूट, गृहोपयोगी भेटवस्तू अशा नावीन्यपूर्ण योजना मांडल्या आहेत. यंदाचे वैशिष्टय़े म्हणजे, पारंपरिक ग्राहकांबरोबर लग्नसराईसाठीदेखील हा मुहूर्त साधला जाणार आहे. पितृपक्षामुळे लग्नसराईची खरेदी केली गेली नाही. दिवाळीतील तुळशीच्या लग्नानंतर पुढील महिने लग्नसराईचे असल्याने या दिवशी सोने खरेदीला त्या ग्राहकांचाही प्रतिसाद मिळू शकतो असा अंदाज व्यवसायिकांनी वर्तविला.