‘कुणीतरी असावं, गालातल्या गालात हसणारे
भरलेच आसवांनी तर डोळे पुसणारं..’
अशा कुणाच्या तरी शोधात असलेल्या तरूणाईला शुक्रवारी आपल्या भावना ‘कुणापर्यंत’ सहजपणे पोहोचविता याव्यात याकरिता वेगवेगळ्या साहित्याची बाजारात रेलचेल झाली आहे. परंतु, या पध्दतीने आपल्या जोडीदाराला खुश करण्याचा मनसुबा बाळगणाऱ्यांना आर्थिक भरुदड सोसण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. जागतिक प्रेम दिनाच्या पाश्र्वभूमीवर, पारंपरिक भेटवस्तुंबरोबर संगीतमय शुभेच्छापत्र, टेडी बिअर बाजारात विराजमान झाले आहेत. दुसरीकडे, तरुणांच्या गटांनी एकत्र येत ७ ते १४ फेब्रुवारी या सात दिवसांचे खास ‘प्रेमाचे कॅलेंडर’ तयार केले असून महाविद्यालय परिसरातील वातावरणही गुलाबी थंडीप्रमाणे बदलल्याचे जाणवत आहे.
मागील काही वर्षांंपासून जागतिक प्रेम दिन हा राजकीय वादात सापडलेला दिवस म्हणुन ओळखला जात असे. शिवसेनेकडून त्यास प्रखर विरोध केला जात असल्याने तरूणाईमध्ये तो उघडपणे साजरा करताना विचार केला जात होता. परंतु, शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील बुरुज ढासळले, तसतसा या दिवसाला विरोधही पूर्णपणे मावळला. यामुळे दोन ते तीन वर्षांपासून तरुणाई तो उत्स्फुर्तपणे खुलेपणाने साजरा करताना दृष्टिपथास पडत असून यंदाचा दिवसही त्याला अपवाद राहणार नाही, असे चित्र आहे. राजकीय विरोध मावळला असला तरी तरुणाईला दुसरी धास्ती असते ती, महाविद्यालयाबाहेरील पोलीस बंदोबस्ताची. यामुळे शहराबाहेर हा दिवस साजरा करण्याचा काहींचा निर्धार असतो. हा दिवस हटके  पध्दतीने साजरा करण्यासाठी आपल्या जोडीदाराला खुश करण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधले जातात. एरवी शुभेच्छापत्र, टेडी बिअर, ज्वेलरी, घडय़ाळ, चॉकलेट या सारख्या भेटवस्तू दिल्या जातात. परंतु, कालानुरूप त्यात काहीसे बदल झाले आहेत. आपल्या जोडीदाराची आवड, त्याचे व्यक्तिमत्व आदींचा विचार करून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तुला खास वैयक्तीक ‘टच’ही देण्यात येत आहे.
आपल्या आवाजात मुद्रीत केलेला शुभेच्छा पत्रातील संदेश किंवा टेडी बिअरच्या माध्यमातून आवडत्या व्यक्तीला देण्याची व्यवस्था आहे. या संदेशाबरोबर त्याला किंवा तिला आवडणारे गाणे ही समाविष्ट करता येते. या स्वरुपाच्या शुभेच्छा पत्राची किंमत ९५० रुपयांपर्यंत आहे. तर टेडीसाठी ५०० ते १२०० रुपये मोजावे लागत आहे. इतका खर्च ज्यांना झेपणारा नाही त्यांचीची काळजी विक्रेत्यांनी घेतली आहे. ‘मॅजिक मग’ हे त्याचे उदाहरण. या मगमध्ये गरम गरम चहा वा कॉफी पिताना त्या कपावर भेटवस्तु देणाऱ्या व्यक्तीची प्रतिमा उमटण्याची व्यवस्था आहे. या शिवाय, घडय़ाळ व फिरती छायाचित्र चौकट यावर साधारण सात छायाचित्र लावण्याची सोय असल्याने काही निवडक क्षणांची सोबत कायम राहणार आहे. या भेटवस्तुंना तरूणाईची विशेष पसंती लाभली आहे. जागतिक प्रेम दिनाचे औचित्य साधून भावना प्रगट करण्यासाठी वेगवेगळ्या भेट वस्तू बाजारात दाखल झाल्या असल्या तरी ग्राहकांचा प्रतिसाद मात्र त्यास अत्यल्प असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. महागाई हे त्यामागील कारण आहे. भेटवस्तुंच्या किंमती दुप्पट वा तिपटीने वाढल्या आहेत. त्यामुळे प्रेमीजन तुलनेत स्वस्त: पर्यायांच्या शोधात आहेत. काही महाविद्यालयीन गटांनी केवळ प्रेम दिवस साजरा करण्याऐवजी ‘प्रेमाच्या कॅलेंडर’ नुसार वेगवेगळे दिवस आठवडाभर साजरे करण्यास सुरूवात केली आहे.