डॉलरच्या तुलनेत रुपयाने विक्रमी लोळण घेतली असतानाच शेतीमालाच्या भावात आठवडाभरातच पुन्हा तेजीचे पर्व सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. डॉलर अधिकच मजबूत होत असल्यामुळे आयात शेतीमालाचे भावही वेगाने वधारत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून तूर, उडीद, हरभरा, मूग यांची बर्मा, चीन आदी देशांतून मोठय़ा प्रमाणात आयात सुरू आहे. मात्र, आयातीवर खुल्या बाजारपेठेच्या नावाखाली कोणतेच र्निबध लागू नसल्यामुळे दुय्यम दर्जाचा मालही भारतीय बाजारपेठेत कमी किमतीत पाठवला जात आहे. परिणामी शेतीमालाचे भाव पडले. परंतु आता डॉलरची किंमत लक्षणीय वधारल्यामुळे आयात मालाचे भावही तेजीत आहेत. परिणामी स्थानिक बाजारपेठेतील मालाचे भाव प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपयांच्या पटीने वधारले आहेत.
चालू पावसाळय़ात जूनच्या प्रारंभीपासूनच चांगला पाऊस पडला. मात्र, पारंपरिक उडीद, मुगाचा पेरा कमी प्रमाणात झाला. लातूर बाजारपेठेत उडदाची ३०० क्विंटल आवक सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांपासून उडदाचा भाव क्विंटलला ३ हजार ३०० रुपये होता. केंद्राचा हमीभाव ४ हजार ३०० प्रतिक्विंटल असूनही ३ हजार ३०० रुपयांनी माल विकावा लागत होता. मंगळवारी उडदाचे भाव ४४०० ते ४५०० रुपयांपर्यंत वधारले. मुगाची आवक दररोज एक हजार क्विंटलची आहे. हमीभाव साडेचार हजार प्रतिक्विंटल आहे. बाजारपेठेत मात्र मुगाचे भाव क्विंटलला ४ हजार ७०० ते ५ हजार २०० रुपयांदरम्यान आहेत.
हरभऱ्याचा भाव चांगलाच घसरला होता. क्विंटलला २ हजार ७०० रुपये भावाने हरभरा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. मंगळवारी हा भाव ३ हजार २५० रुपये होता. तुरीच्या बाजारपेठेवरही परिणाम होऊन ४ हजार १०० रुपये क्विंटलपर्यंत भाव घसरले होते. सध्या बाजारपेठेत तुरीचा भाव ४५०० ते ४६०० रुपयांदरम्यान आहे. चालू वर्षी देशभरात चांगला पाऊस झाला. गुजरात, मध्य प्रदेश, विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक झाल्यामुळे मूग, उडीद उत्पादनात १५ ते २० टक्के घट होईल, असा अंदाज आहे. अर्थात, पुढे पाऊस कसा राहील? यावरही मालाचे भाव ठरणार आहेत.
केंद्राच्या तुलनेत सोयाबीनला ३ हजार २०० रुपये हमीभाव!
केंद्र सरकारने सोयाबीनचा हमीभाव येत्या हंगामासाठी २ हजार ५६० रुपये जाहीर केला. जिल्हय़ात या वर्षी सोयाबीनचा पेरा ८० टक्के आहे. त्यामुळे सोयाबीनचे विक्रमी पीक येईल व भाव पडतील, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. कीर्ती गोल्डचे अशोक भुतडा यांनी मात्र सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय उत्पादनाचा अंदाज घेत वर्षभरासाठी सोयाबीनचा हमीभाव ३ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल जाहीर केला आहे. सप्टेंबरपासून शेतकऱ्यांनी आपल्या मालाची आगाऊ नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. सोयाबीनच्या भावात मागील वर्षी ४ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल भावाने तेजी आली होती. मात्र, ऑगस्टमध्ये सोयाबीनचे भाव घसरून २ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल झाले होते. मंगळवारी सोयाबीनच्या भावात ३ हजार ६०० रुपयांपर्यंतची वाढ झाली.